अध्याय एकोणतिसावा
काहीही झाले आणि कितीही समजावून सांगितले तरी उद्धवाला आपला विरह सहन होण्यासारखा नाही हे लक्षात आल्यावर भगवंतांनी उद्धवाला त्यांच्या पादुका प्रसाद म्हणून दिल्या. त्या त्याने मस्तकावर धारण केल्यावर आता भगवंत कायम आपल्याबरोबर आहेत ह्य्aााची त्याला खात्री वाटून उद्धव एकदम शांत झाला. श्रीकृष्णनाथांना त्याने तीनवेळा प्रदक्षिणा घातली. श्रीकृष्णाचा चेहरा नीट निरखून त्याच्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवला. श्रीचरणांना नमस्कार केला आणि सद्गुरूंच्या आज्ञेनुसार उद्धव बद्रिकाश्रमात जायला निघाला. बद्रिकाश्रमाच्या दिशेने जात असताना, वाटेत त्याला विदुर भेटले. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले. एकमेकांचे कुशल सावचितपणे विचारू लागले. बोलताबोलता विदुरांनी त्याला श्रीकृष्णाचे निधन झाल्याचे सांगितले. खरं म्हणजे विदुरांची अशी अपेक्षा होती की, श्रीकृष्णाचे निधन झाल्याचे ऐकल्यावर उद्धवाला धक्का बसेल, तो धाय मोकलून रडायला लागेल, छाती पिटून घेईल कारण त्याला त्याच्या सद्गुरूंच्या निधनाचे अनिवार दु:ख होईल पण तसं काहीही घडलं नाही. उद्धव दीनवदन झालेला त्यांना बिलकुल दिसला नाही. अर्थात विदुरही काही कमी नव्हते. त्यांनी उद्धवाची ही चिन्हे बघितल्यावर लगेच ओळखले की, ह्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले आहे. जेव्हा गुरु आणि शिष्य दोघेही श्रेष्ठ असतात तेव्हा सद्गुरू कधी मरत नसतात. ह्या वचनावर शिष्याचा विश्वास असल्याने त्याला सद्गुरूंच्या निधनाचे म्हणजे त्यांचे सगुण रूप नष्ट झाल्याचे वाईट वाटून बिलकुल रडू येत नाही कारण आपले सद्गुरू आपल्याबरोबर कायम आहेत ह्याची त्याला खात्री असते. म्हणून म्हणतात, सद्गुरू कधी मरत नसतात आणि सद्गुरूंच्या मरण्याने शिष्य कधी रडत नसतो कारण गुरु आणि शिष्य ह्या दोघांनाही ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले असते. गुरु आणि चेला दोघेही आत्मस्वरूप झालेले असतात. मेलेल्या माणसाविषयी ज्ञानी लोक कधीही दु:ख करत नाहीत असे गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितले आहे ते ह्याच संदर्भात आहे. भगवंताच्या ह्या सांगण्याला धरूनच श्रीकृष्णाचे निधन झालेले आहे असे विदुरांनी सांगूनसुद्धा उद्धव अविचल होता. त्यावरून विदुरांच्या लक्षात आले की ह्याच्यावर कृपामूर्ती श्रीकृष्ण प्रसन्न झालेले आहेत. त्यामुळे ह्याची मोह आणि ममतावृत्ती नाहीशी झाली आहे. दोघेही आत्मस्वरूप झाले आहेत आणि परमानंद प्राप्त झाल्याने स्वानंदस्थितीत डोलत आहेत. त्यामुळे श्रीकृष्णाचे निधन झाल्याने त्यांची सगुण मूर्ती लोप पावली आहे हे समजल्यावर त्याच्या मन:स्थितीत काहीही फरक पडलेला नाही. ह्याला बोलताना शब्दाचा आधार लागत नाही, जमिनीचा आधार न घेता हा चालतो, नामरूपाशी एकरूप झालेला असला तरी नामरूपाला सोडत नाही, जीभेशिवाय रस चाखू शकतो, डोळ्यांशिवाय पाहू शकतो, इंद्रीयांशिवाय निजात्मसुखात राहून हा सुखाचा उपभोग घेतो. हे सर्व पाहून ह्याला आत्मज्ञान झालेले आहे ह्या विदुरांच्या निष्कर्षाला बळकटीच येते. निर्विकल्प असलेल्या आणि निजबोधात राहून भक्ती, ज्ञान, वैराग्य ह्यांनी परिपूर्ण असलेल्या उद्धवाला पाहून विदुरांना अतिशय आनंद झाला. त्या आनंदातून भानावर आल्यावर ते उद्धवाला विनवणीच्या सुरात म्हणाले, तुझ्यावर हृषीकेशी प्रसन्न झालेला आहे. त्यामुळे तुला त्याच्याकडून ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले आहे. तू धन्य झाला आहेस. आता त्या ब्रह्मज्ञानाचा मला उपदेश कर. विदुरांची विनवणी ऐकून उद्धव त्यांना म्हणाला, निजधामाला जात असताना शेवटी श्रीकृष्णाला तुमची आठवण झाली. त्यामुळे तुम्ही धन्य झाला आहात पण भगवंतांनी मैत्रेयाला तुम्हाला ब्रह्मज्ञान द्यायला सांगितले आहे. जर कृष्णाने मला आज्ञा केली असती तर मी तत्काळ तुम्हाला तत्वबोध केला असता.
क्रमश:








