क्षुल्लक कारणावरून चाकूहल्ला : कीर्ती हॉटेल परिसरातील घटना, महिलेला अटक
बेळगाव : जत्रेच्या खरेदीसाठी मित्रासमवेत बेळगावला आलेल्या तारिहाळ, ता. बेळगाव येथील एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. रविवारी रात्री ढोर गल्ली क्रॉस, कीर्ती हॉटेलजवळ ही घटना घडली असून एका मद्यपी महिलेने हकनाक या तरुणाचा बळी घेतला आहे. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. नागराज भीमसी रागीपाटील (वय 26) रा. तारिहाळ, ता. बेळगाव असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. रविवारी रात्री ही घटना घडली असून या घटनेनंतर परिसरात काहीकाळ धावपळ उडाली. पोलिसांनी जयश्री पवन पवार (वय 35) रा. कंग्राळी खुर्द या महिलेला अटक केली आहे. घटनेची माहिती समजताच मार्केटचे पोलीस निरीक्षक पॉल प्रियकुमार व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून नागराजचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. खुनाच्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. तारिहाळ येथील नागराज भीमसी रागीपाटील व त्याचा मित्र नागेंद्र रामा कुकडोळी हे दोघे केए 22 एचएच 5285 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून रविवारी बेळगावला आले होते. गावच्या जत्रेसाठी हे दोघे खरेदीला आले होते. कीर्ती हॉटेलजवळ रात्री 10 वाजण्याच्या सुमारास नागराज व नागेंद्र जात होते. याचवेळी जयश्री पवार ही महिला नशेत चाकू फिरवत रस्त्यावर गोंधळ माजवत होती. नागराजला अडवून त्याला मोबाईल देण्यास सांगितले. नागराजने मोबाईल देण्यास नकार देताच आपल्या हातातील चाकूने त्याच्या छातीवर वार केला. नागराज व त्याच्या मित्राला शिवीगाळ करत वार करताच नागराज तेथेच कोसळला. त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. घाव वर्मी लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
पोलीस दलाचे अपयश
अनैतिक प्रकारांवर आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे. जुना पी. बी. रोड, खडेबाजार, मध्यवर्ती बाजारपेठेतील गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक परिसरात रात्रीच्यावेळी अनेक अनैतिक प्रकार चालतात. या प्रकारांना स्थानिक व्यापारीही वैतागले आहेत. नशेत धिंगाणा घालणाऱ्या काही महिलांमुळे सामान्यांना ये-जा करणे कठीण झाले आहे. कारण या महिला कधी वादावादी सुरू करतील आणि कोणत्या थराला जातील, याचा नेम नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणूस आपल्या अब्रूला घाबरून या परिसरात वावरत असतो. रविवारी रात्री घडलेला खुनाचा प्रकार अशाच मद्यपी महिलेने केला. मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेले अनैतिक प्रकार रोखण्यात पोलीस दल अपयशी ठरले आहे. त्यामुळेच असे प्रकार वाढीस लागले आहेत.









