ठळकवाडी, गोमटेश विजेते
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे तात्यासाहेब मुसळे माध्यमिक स्कूल आयोजित टिळकवाडी विभागीय क्रीडा स्पर्धेत थ्रोबॉल व व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांमध्ये ठळकवाडी संघाने गोमटेश मराठीचा, मुलींमध्ये बालिका आदर्शने गोमटेश मराठीचा पराभव करुन विजेतेपद पटकाविले. थ्रोबॉल स्पर्धेत मुलांमध्ये गोमटेश हायस्कूलने गोमटेश मराठीचा तर बालिका आदर्शने गोमटेश हायस्कूलचा पराभवकरुन विजेतेपद पटकाविले. गोमटेश हायस्कूलच्या मैदानावरती व्हॉलीबॉल व थ्रोबॉलच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तात्यासाहेब मुसळे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शिल्पा कवडी, क्रीडा शिक्षिका अनुराधा जाधव, ठळकवाडी शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष विवेक पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते मैदानाची पूजा करुन उद्घाटन करण्यात आले.
माध्यमिक मुलांच्या विभागात 12 व्हॉलीबॉल संघांनी तर 7 थ्रोबॉल संघांनी भाग घेतला होता. व्हॉलीबॉल स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ठळकवाडी संघाने गोमटेश हायस्कूल संघाचा 15-12, 15-7 तर दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात गोमटेश मराठीने स्वाध्या विद्यामंदिर संघाचा 15-13, 12-15, 15-9 अशा सेटमध्ये पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत ठळकवाडी संघाने गोमटेश मराठीचा 25-22, 25-20 अशा गुण फरकाने पराभव करुन विजेतेपद पटकाविले. मुलांच्या थ्रोबॉल स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गोमटेश मराठीने ठळकवाडी संघाचा 21-18, 21-16 अशा गुण फरकाने तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गोमटेश हायस्कूलने एसएनके मजगाव संघाचा 21-17, 15-21, 15-12 अशा गुण फरकाने पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात गोमटेश हायस्कूलने अटितटीच्या लढतीत 21-19, 19-21, 15-12 अशा गुणफरकाने पराभव करुन विजेतेपद पटकाविले.
मुलींच्या विभागात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बालिका आदर्शने गोमटेश मराठीचा 15-12, 15-12 तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गोमटेश हायस्कूलने डी.पी. संघाचा 15-13, 10-15, 15-9 अशा गुण फरकाने पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत मात्र बालिका आदर्शने गोमटेश हायस्कूलचा 15-12, 15-13 अशा गुण फरकाने पराभव करुन विजेते पद पटकाविले. मुलींच्या थ्रोबॉल स्पर्धेत गोमटेश हायस्कूलने डी.पी. संघाचा 21-16, 21-15 अशा गुण फरकाने तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बालिका आदर्शने गोमटेश मराठीचा 21-17, 21-19 अशा गुण फरकाने पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत बालिका आदर्शने अटितटीच्या लढतीत 21-18, 18-21, 15-13 अशा गुण फरकाने पराभव करुन विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून देवेंद्र कुडची, विवेक पाटील, किरण तरळेकर, उमेश मजुकर, अनिल जनगौडा, उमेश बेळगुंदकर, सालोमन यांनी काम पाहिले.









