सांगली :
कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारे लाच स्वीकारली जाते, शहरातील एका शासकीय कार्यालयामध्ये पैसे घेण्यासाठी चक्क दक्षिणापेटीच ठेवली असून या पेटीची सध्या चर्चा सुरू आहे. वेतनाची बिले काढण्याचे कार्यालय कायम चर्चेत आहे. पूर्वी हे कार्यालय महापालिकेच्या इमारतीमध्ये होते, ते आता नव्या इमारतीत गेले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून येथून कामकाज सुरू आहे. जुन्या कार्यालयात या कार्यालयातील अधिकारी भेटवस्तुच्या स्वरूपात बिले काढण्यासाठी स्वीकारत होते. याची सर्वत्र चर्चा होती, हीच परंपरा या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सुरू ठेवली आहे. नवीन कार्यालयात आता लाच स्वीकारण्याचा प्रकार बदलला आहे. कार्यालयाच्या प्रमुख असलेल्या महिला अधिकाऱ्यांने लाच स्वीकारण्यासाठी चक्क टेबलाचा ड्रॉव्हरचा वापर केला होता, ठरलेली रक्कम हातात न घेता त्या कपाटात टाकण्यास सांगण्यात येत होते, आता संबधित महिला अधिकाऱ्याची बदली अन्यत्र झाली आहे.
शासकीय वेतनासाठी या कार्यालयाचा महत्वाचा रोल आहे, त्यामुळे या कार्यालयाने वेतनाचा मेळ लावल्याशिवाय संबंधित कर्मचाऱ्याचे वेतन फिक्सेशन होत नसल्याने कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी म्हणतील तेवढी रक्कम तेथे द्यावीच लागते, गेल्या अनेक वर्षापासून या कार्यालयातून होणारी लूट माहिती असूनही याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे. शासकीय कार्यालयातील लाचखोरीची कीड कशी संपणार हा प्रश्न आहे.








