चोरी प्रमाणे आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न देखील केवळ माणसेच करु शकतात, अशी समजूत आहे. सहसा कोणत्या प्राण्याने आत्महत्या केली असे आपल्या ऐकिवात येत नाही. काही पक्षी किंवा कीटक ज्वालेवर झेप घेऊन स्वत:ला जाळून घेतात अशा कथा आपण ऐकतो. पण तसे स्वत: पाहिल्याचे कोणी सांगत नाहीत. याचाच अर्थ असा की सर्वसाधारणत: प्राणी किंवा पाळीव प्राणी आत्महत्या करीत नाहीत. तथापि, आपली ही समजूत खोटी ठरावी, अशी घटना घडलेली आहे. एका पाळीव कुत्र्याने एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तसा एक व्हिडीओ सध्या प्रसारित होत असून तो लक्षावधी लोकांनी पाहिलेला आहे. लोकांनी त्यांचे अंदाजही व्यक्त केले आहेत. ही घटना ब्रिटनमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.
या श्वानाने चौथ्या मजल्यावरुन खाली उडी घेतली. ती त्याने त्याचा अंदाज चुकल्याने नव्हे, तर हेतुपुरस्सर घेतल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे खाली जमीनीवर पडल्यानंतर त्याला मोठ्या जखमा झाल्या आणि आंतर्गत रक्तस्त्रावही झाल्याचे दिसून आले. त्याचा मृत्यू त्वरित झाला नाही. पण तो गंभीर जखमी झाला आहे. सर्वसाधारणपणे प्राण्यांना उंचीची कल्पना योग्य प्रकारे येते. ते ज्या उंचीवर थांबलेले आहेत, तेथून खाली उडी घेणे हे आपल्या आवाक्यात आहे की नाही, याचे नेमके अनुमान ते काढू शकतात. तथापि, या श्वानाने तसे काहीही केल्याचे दिसत नाही. त्याने सरळ खाली उडी घेतल्याचे पहावयास मिळते. यावरुन त्याने आत्महत्या करण्यासाठीच ही उडी घेतली, असे म्हणावयास जागा आहे. ही प्राणी जगतातील एक दुर्मिळ घटना असल्याचे तज्ञांचेही मत आहे.









