आपल्याला आदरणीय असणाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची स्मृती स्थायी स्वरुपात रहावी, यासाठी त्यांचे स्मारक स्थापन करण्याची पद्धती प्रत्येक संस्कृतीमध्ये इतिहासकाळापासून रुढ आहे. ही स्मारके केवळ माणसांची असत नाही. तर माणसांसाठी उपयोग पडलेल्या प्राण्यांचीही असतात. राजस्थान राज्यातील जालोर जिल्ह्यात तिलोडा दादाल येथे एका श्वानाचे स्मारक स्थापन करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर या स्मारकाची भक्तीभावाने पूजा केली जाते.

हे क्षेत्र काही काळापूर्वी वनक्षेत्र होते. तेथे मोठ्या संख्येने विविध पशू-पक्षी संचार करीत होते. या वनात वराह मोठ्या संख्येने होते आणि त्यांची शिकार करण्यासाठी दूरदूरच्या गावांहून शिकारी येथे येत असत. एकदा, एका शिकाऱ्याचा कुत्रा या रानडुकरांच्या हल्ल्यात जखमी झाला होता. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. तेव्हापासून या शिकाऱ्यावर अनेक कौटुंबिक, आर्थिक आणि मानसिक संकटे कोसळत गेली. अनेक वर्षे त्याने या संकटांना तेंड दिले. नंतर त्याला एक मांत्रिक भेटला. मांत्रिकाने त्याला त्याच्या मृत श्वानाचे स्मारक उभे करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्याने कुत्र्याचा मृत्यू ज्या स्थानी झाला होता, तेथे त्याची समाधी बांधली. त्यानंतर त्याच्यावरची संकटे संपली, असे म्हटले जाते. तेव्हापासून या गावातील गावकरी या समाधीची मनोभावे पूजा करतात. त्यांना हा श्वान आदर्श वाटतो.









