भारत आणि पाकमधील युद्धसंघर्षाला विराम मिळाला असला, तरी व्यापारासह एकूण राजनैतिक पातळीवरील जागतिक युद्ध यापुढेही सुरूच राहणार असल्याचे दिसते. खरे तर स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. आजवर उभय देशांमध्ये तीन मोठी युद्धे तसेच अनेक छोट्या, मोठ्या लढाया झाल्याचेही इतिहास सांगतो. असे असताना त्यांच्यातील अंतर्गत संघर्षात विनाकारण पडणे म्हणजे अवसानघातकीपणाच. हा असाच उद्योग तुर्किये व अझरबैजान या दोन देशांनी करून एकप्रकारे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड घालून घेतली आहे. खरे तर या दोन्ही देशांनी आपले व्यापारी संबंध लक्षात घेत त्रयस्थ भूमिका घेणे अपेक्षित होते. मात्र, व्यावहारिकतेचा विचार न करता धर्मांधतेवर भुलून त्यांनी पाकिस्तानला पाठबळ देणे पसंत केले. त्यात प्रत्यक्ष युद्धात तुर्कियेची युद्धसामग्री आढळून आल्याने पडद्यामागून त्यांनी भारतविरोधी भूमिका घेतल्याचे अधोरेखित झाले. हे बघता अशा देशाला वेगवेगळ्या माध्यमातून धक्का देणे, ही परिस्थितीची गरजच म्हणता येईल. मागच्या काही दिवसांत पर्यटन, व्यापाऱ्यासह इतर बाजूने तुर्कियेंविरोधात ‘तुर्किये बायकॉट’ हा ट्रेंड चालविण्यात येत आहे. या देशासाठी हा जबर धक्काच ठरावा. तुर्किये आणि अझरबैजान या दोन देशांमध्ये भारतीय पर्यटक मोठ्या प्रमाणात सफरीसाठी जातात. मागच्या दोन ते तीन वर्षांचा विचार केला, तर दोन देशांमध्ये जाणाऱ्या भारतीयांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे पहायला मिळते. 2023 मध्ये तुर्कियेला 2 लाख 50 हजार भारतीय पर्यटकांनी भेट दिली होती. हीच संख्या वर्षभरात म्हणजेच 2024 पर्यंत साडेतीन लाखांवर पोहोचल्याची आकडेवारी सांगते. अझरबैजानमध्येही एका वर्षांतील पर्यटकांची संख्या दीड लाखावरून अडीच लाखांपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येते. तथापि, ट्रॅव्हल्स अँड टूर्स कंपन्या व भारतीय पर्यटकांनी या दोन देशांसह चीनवरही बहिष्कार घातल्याने या देशांमधील पर्यटन हंगाम अडचणीत सापडला आहे. तुर्किये आणि अझरबैजान या देशांमध्ये सध्या वसंत ऋतूमुळे अतिशय आल्हाददायक वातावरण आहे. मे ते जुलै या कालावधीत हे दोन देश पर्यटकांनी गजबजलेले असतात. परंतु, दोन्ही देशांच्या सहलींवर पर्यटकांनी उत्स्फूर्तपणे बहिष्कार घातल्याने अनेक बुकिंग्ज रद्द करण्यात आली आहेत. याशिवाय या देशांना पर्याय म्हणून व्हिएतनाम, मॉरिशस, इंडोनेशिया, बाली तसेच जॉर्जिया, उझबेकिस्तान, कझाकिस्तान अशा देशांची नावेही सुचविण्यात आली आहेत. खरे तर तुर्किये व अझरबैजानच्या अर्थव्यवस्थेमध्ये पर्यटनाचा विशेष वाटा आहे. हे बघता भारतीयांच्या तुर्किये बॉयकॉटचा संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची भीती संभवते. याशिवाय तुर्कियेतून सफरचंद व संगमरवरही देशात मोठ्या प्रमाणात आयात केले जाते. सफरचंद हे भारतीयांचे आवडते फळ. काश्मीर, हिमाचलमधील सफरचंदाबरोबरच वॉशिंग्टन, इराण, न्यूझिलंडमधून भारतात सफरचंद येतात. तथापि, पाकिस्तानला पाठबळ देणाऱ्या तुर्कियेविरोधातील ‘बॉयकॉट टर्किश प्रॉडक्ट’ ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. तुर्कियेच्या सफरचंदांवर भारतीय व्यापाऱ्यांनी घातलेला बहिष्कार हा त्याचाच भाग. परिणामी तुर्कियेतील सफरचंदांना सध्या उठाव मिळताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर पुण्यातील काही व्यापाऱ्यांना पाकिस्तानमधून धमकीचा फोन आला असून, याबाबत पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येते. तसे पाहिल्यास संपूर्ण जगात आज भारतासारखी मोठी बाजारपेठ नाही. त्यामुळे व्यापारउदीमासह देशाच्या आर्थिक हिताकरिता भारताचे आकर्षण कुणाला न वाटले, तर ते नवलच. परंतु, भारताला कुणी गृहीत धरत असेल, तर त्यांचे नाक दाबलेच पाहिजे. त्यामुळे तुर्कियेच्या सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसची सुरक्षा मंजुरी केंद्राने रद्द केली, हे बरेच झाले. या सगळ्या व्यापारयुद्धात तुर्किये आदी देशांचे प्रत्येकी तीन हजार कोटी ऊपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले जाते. हा आकडा ध्यानात घेऊन भविष्यात तरी संबंधितांनी यातून बोध घ्यायला हवा. एकेकाळी तुर्कस्थान हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून ओळखले जायचे. मुस्तफा कमाल पाशा यांनी या देशाला आधुनिक आणि सेक्युलर राष्ट्र म्हणुन पुढे आणले. रूढीवाद व इस्लामी नीतिनियमांपासून त्यांनी देशाला कायम दूर ठेवले. परंतु, आज या देशाची वाटचाल उलट्या दिशेने सुरू आहे. मागच्या काही दिवसांत कट्टरतावाद व धर्मांधता हाच या देशाचा प्रमुख कार्यक्रम बनला आहे. त्यामुळेच पाकसारख्या दहशतवादी राष्ट्राला पाठिंबा देण्यापर्यंत तुर्कियेची मजल गेलेली दिसते. धार्मिक कट्टरतावादाने पाकिस्तानला वाटोळे केले. तोच कित्ता तुर्किये किंवा अझरबैजानसारखे देश गिरवत असतील, तर त्यांची अवस्थाही पाकसारखीच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी काळातील युद्ध हे केवळ जल, जमीन किंवा हवाई क्षेत्रापुरते मर्यादित नसेल. तर वेगवेगळ्या माध्यमातून ते लढले जाईल, असे विचारवंत म्हणतात. भारत-पाक संघर्षातून त्याचा प्रत्यय येतो. ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे उडालेला व्यापार युद्धाचा भडका आपण पहातच आहोत. हे बघता आगामी काळात त्याच्या झळा कुणाला कशा बसतील, हे सांगता येणार नाही. भारतात आयफोन नको, असे ट्रम्प यांनी ‘अॅपल’चे सीईओ टीम कूक यांना सांगणे, हेदेखील एक प्रकारे व्यापारी संघर्षाचेच उदाहरण ठरावे. ट्रम्प यांच्याकडे केवळ आवेश आहे, दूरदृष्टी नाही. त्यामुळे भारतासारख्या राष्ट्राला दाबण्याचे परिणाम आपल्यावरही होऊ शकतात, हे त्यांच्या गावी नसावे. काही असो. परंतु, पुढच्या काळात सर्वच आघाड्यांवर लढण्यासाठी भारताला सुसज्ज रहावे लागेल.
Previous Articleभारतीय गिर्यारोहकाचा माउंट एव्हरेस्टवर मृत्यू
Next Article भारतासोबत चर्चा करावी लागणार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








