अध्याय एकोणतिसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा जो सर्व भूतांत नेहमीच भगवद्स्वरूप पहात असतो त्या महात्म्याचा देहाभिमान क्षणार्धात नाहीसा होतो. त्याचा देहाभिमानच नष्ट होतो असं नाही तर त्याबरोबर असलेले देहाभिमानाचे कुटुंबीयसुद्धा तोंड काळे करून निघून जातात. जेव्हा साधक सर्वांभूती भगवद्भाव पाहू लागतो तेव्हा अहंभाव म्हणजे स्वत:च्या देहाविषयी वाटणारी ममता नष्ट होते. ममता नष्ट झाली की, कुणाची निर्भत्सना करणे, कुणाच्यापोटी दोष चिकटवणे, कुणाचा तिरस्कार करून त्याच्या साधनेत विघ्न आणणे इत्यादि दुसऱ्याला त्रास होईल अशा गोष्टी करण्याची इच्छा आपोआपच नष्ट होते. म्हणून उद्धवा, सर्वाभूती समदृष्टी ठेवणे हेच माझे भजन आणि माझ्या प्राप्तीचे श्रेष्ठ साधन आहे हे निश्चित समज. ह्याप्रमाणे माझी भक्ती केली असता पूर्णब्रह्माचा लाभ होतो आणि ही गोष्ट नरदेहातच साध्य होते. हे साध्य होण्यासाठी देहाचा गर्व करू नये, देहाबद्दल वाटणारी ममता सोडून द्यावी, आपण कुणीतरी श्रेष्ठ आहोत हा विचार मागे टाकावा, सर्वांभूती समभाव ठेवल्याने लोक हसतील, नावे ठेवतील ही भीती सोडून द्यावी. हे सर्व आचरणात आणले की, ब्रह्मसायुज्य हाती लागते. मी सांगितलेली सर्व पथ्ये पाळून, माझी चौथी भक्ती करणे हे ब्रह्मप्राप्तीसाठी सहज करता येण्यासारखे सोपे साधन आहे. हे सर्व मी सांगितले खरे पण हे साधन कुणीही करू म्हंटले तरी शक्य होत नाही कारण माणसाला लोकेषणा म्हणजे यश, ख्याती, मानसन्मान इत्यादि समाजात ताठ मानेने फिरण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचे फार आकर्षण असते. चौथी भक्ती करावीशी वाटणाऱ्याने आपल्या जातीचा अभिमान सोडून द्यावा, आपण शहाणे आहोत हा समज नाहीसा करावा आणि लहानातल्या लहान अणुरेणुलाही नमस्कार करावा. हे ज्या प्रमाणात भक्त करू लागेल त्या प्रमाणात ब्रह्मप्राप्ती हाती लागते. ज्यावेळी ह्याखेरीज भक्त इतर कोणतीही गोष्ट करत नाही त्यावेळी पूर्ण ब्रह्मप्राप्ती होते. माझ्या चौथ्या भक्तीची सुरवात लहानातल्या लहान अणुरेणुलाही नमस्कार करून करावी. ह्यातली प्रमुख अडचण अशी की, भक्ताने सुहृदांना बघून लोटांगण घालायला सुरवात केली ती ते त्याला हा किती खुळा आहे म्हणून जोरजोरात हसू लागतात आणि यथेच्छ टर उडवतात. म्हणून भक्ताने काय करावे, तर त्याला कुणी ओळखत नाहीत अशा ठिकाणी जाऊन गाय, गाढव, कुत्रा ह्यांना लोटांगण घालण्यास सुरवात करावी. लोक आपल्याला हसतात, टर उडवतात म्हणून भक्ताला लाज वाटू लागते पण अशी लाज वाटू लागली तर माझी चौथी भक्ती साध्य होत नाही. म्हणून निर्लज्जपणे सुहृदांना नमस्कार करावा. सासु, सासरा, जांवई, इष्ट मित्र, व्याही असे लहानमोठे जवळचे लोक व इष्टमित्रादि मंडळी बघितली की, बिलकुल लाजू नये. तसेच गाय, गाढव, कुत्रा आदिनाही ती सर्व माझीच रूपे आहेत हे लक्षात घेऊन कसलीही लाज न बाळगता लोटांगण घालावे. नुसता हात जोडून नमस्कार करून भागणार नाही. ह्या सर्वांच्या ठिकाणी माझी वस्ती आहे ह्या भगवद्भावाने लोटांगण घालण्याला फार महत्त्व आहे. जेव्हा चौथी भक्ती करण्याचे भक्त ठरवतो तेव्हा त्याला सर्वाभूती ईश्वराचा वास असण्याची ठाम खात्री वाटणे फार महत्त्वाचे आहे. एकदा ही खात्री पटली की, लहानथोर माणसे, प्राणि ह्यात भेदभाव करावा असे मनातसुद्धा येत नाही. मग माशी, मुंगी, ढेकुण ह्यांनाही सहजी लोटांगण घातले जाते. भक्तीभावाने गाय गाढव, कुत्रा ह्यांना नमस्कार केला की भगवद्भजनतेज प्रकटते. आता असं हे साधन कुठपर्यंत करावं असं विचारशील तर तेही सांगतो. ऐक, जोपर्यंत आपण ज्याला नमस्कार करतोय त्याचे समोर दिसणारे मनुष्य किंवा प्राणि रूप दिसायचे बंद होऊ त्या सर्वांच्यात चिद्रूप दिसायला लागेपर्यंत हे साधन करावं. मनात येणाऱ्या कल्पनेच्या पलीकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्यात्या अनुभवाला येऊ लागल्या की आपले मूळ स्वरूप जे मझ्या रूपाने नटलेले आहे ते दिसू लागते.
क्रमश:








