अध्याय एकोणतिसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा तुझे भाग्य थोर आहे म्हणून मी माझ्या जिव्हाळ्याची गोष्ट तुला सांगितली. हे माझे सांगणे साराचे सार आहे असे समज. जो चांगलं काम करत असतो त्याला विघ्नांच्या रूपाने येणाऱ्या अडचणी सतावत असतातच पण जो माझी निष्काम भक्ती करेल त्याला विघ्नांच्या गुंत्यात पडून रहावे लागत नाही. माझ्या भक्तीच्यापुढे विघ्ने तोंड काळे करून कुठच्याकुठे पळून जातात. अशा भक्तापुढे परब्रह्म हात जोडून उभे राहते आणि ह्यात विशेष असे काही नाही कारण त्यावर त्याचा हक्कच असतो. त्यासाठी भक्ताने कोणत्याही हेतुशिवाय कर्म करावे आणि ते मला अर्पण करावे. असे करणे हेच माझ्या भक्तीचे उत्तम लक्षण आहे. पूजापाठ, यज्ञयाग, ध्यानधारणा, मंत्रपठण, वेदाभ्यास अशी भक्तीची अन्य साधने आहेत पण ती करणाऱ्या साधकांच्या मनात कुठेतरी मी कर्ता आहे हा भाव थोडासा का होईना पण जागृत असतो आणि त्यामुळे त्यांच्या आणि माझ्यामध्ये पातळसा का होईना पडदा असतो. म्हणून इतर साधने करणाऱ्यांपेक्षा माझी निरपेक्ष भक्ती करणारा भक्त मला अधिक प्रिय आहे. त्याला माझ्याकडून काहीही नको असते. केवळ माझ्या सहवासाला तो आसुसलेला असतो. भगवंतांचे हे बोल तुकाराम महाराजांनी हृदयात साठवून ठेवले होते म्हणून त्यांच्या अभंगात ते म्हणतात, हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ।। गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी ।। न लगे मुक्ति धन संपदा। संतसंग देई सदा ।। तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी।। देवाकडे महाराजांचं एकच मागणे आहे ते म्हणजे तुझा मला कधी विसर पडू देऊ नकोस. तुझे गुण गाण्यासाठी पुन्हा गर्भवास सोसावा लागला तरी चालेल. गर्भवास सोसणे अत्यंत त्रासदायक असतं. नऊ महिने गर्भात पडून रहावं लागतं. त्यात पुन्हा खाली डोके वर पाय अशी अवस्था असते. शेवटी नऊ महिने पूर्ण झाल्यावर अतिशय चिंचोळ्या जागेतून बाहेर यावे लागते. तुकाराम महाराज असा गर्भवास सोसायला तयार आहेत कारण नरजन्म मिळाला तरच वाचा लाभते आणि त्या वाचेनेच नामस्मरण करता येते. तुकाराम महाराजांचे मनोगत जाणून घेतल्यानंतर भगवंत उद्धवाला पुढे काय म्हणाले ते जाणून घेऊयात. ते म्हणतात, आता ह्या भक्तीचे स्वरूप कसे असते ते सांगतो. मनुष्य व्यवहारात यशस्वी होण्याच्या अपेक्षेने जो प्रयास करत असतो त्यात यश मिळालं तर ठीक अन्यथा ते वाया जातात पण जर माणसाने जीवनात यशस्वी होण्यासाठी केलेले प्रयास माझ्या चरणी अर्पण केले आणि त्यातील यशापयशाची जबाबदारी माझ्यावर सोपवली तर तो माझ्या भजनी लागला असे होते. म्हणून प्रत्येक कृती करून माझ्या चरणी अर्पण करण्यातच माणसाचे भले आहे कारण त्याची ती कृती माझी भक्ती करण्यामध्ये जमा होते. माझा भक्त जीवनात तो जे जे करतो ते ते सर्व माझ्याकडून कोणतीही अपेक्षा न करता मला अर्पण करतो. मग ते चांगले आहे का वाईट हेही तो पहात बसत नाही. त्याला हे माहित असतं की, कोणतीही गोष्ट करून मला अर्पण केली की, ती माझी सर्वश्रेष्ठ भक्ती होते. त्यामुळे त्याने मला काहीही अर्पण केले तरी मला ते आवडते. उदाहरणार्थ शिमग्याच्या महासणात जे खेळ खेळतात ते सहसा इतरवेळी खेळण्यासारखे नसतात कारण ते बहुधा त्याज्य असतात, असे त्याज्य खेळ खेळून, ते मला अर्पण केले तर तीही माझी भक्तीच होते. उद्धवा समजतंय ना तुला? माझी भक्ती करण्यातलं रहस्य हेच आहे की, माणूस जी जी कृती करेल ती ती त्यानं मला अर्पण करावी. मग ती शुभ असो वा अशुभ! उदाहरणार्थ चोराने चोरी करून ते धन मला मनापासून अर्पण केले तर त्याची ती कृतीही माझी भक्ती ह्या सदरात मोडते. आणखीन काय सांगू? भक्ताकडे एखादा नसलेला पदार्थ ब्रह्मार्पण म्हणून त्याने मला अर्पण केली तर तेही माझ्या भक्तीच्या खात्यात जमा होते.
क्रमश:








