अंघोळीसाठी नदीपात्रात उतरला असताना दुर्घटना
प्रतिनिधी/ पंढरपूर
आषाढी यात्रा अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपली आहे. आषाढी यात्रेवर महापुराचे सावट आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असतानाच शुक्रवारी सकाळी सातच्या दरम्यान चंद्रभागा नदीत भक्त पुंडलिक मंदिराजवळ नदीच्या प्रवाहात बुडून शुभम ज्ञानेश्वर पावले (वय 27, रा. तानाजी गल्ली, अलतगा, ता. जि. बेळगाव) या युवकाचा मृत्यू झाला आहे.
शुभम पावले हा त्याचा चुलत भाऊ वैजनाथ नारायण पावले व इतर मित्रांसोबत विठुरायाच्या दर्शनासाठी आला होता. शुक्रवारी सकाळी चंद्रभागा नदीमध्ये अंघोळीला गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. तब्बल चार तासांच्या शोधकार्यानंतर शुभमचा मृतदेह आढळून आला. आषाढी यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नानासाठी भाविकांची गर्दी होत आहे. प्रशासनाने या ठिकाणी जीवरक्षक यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
विशेष म्हणजे शुक्रवारी सकाळीच आपत्ती व्यवस्थापन यांच्यावतीने पंढरपूर येथे प्रात्यक्षिक करण्यात आले होते. आषाढीवारी काळात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी दहा जीवरक्षक बोटी तैनात करण्यात येणार आहेत. उजनी धरण 60 टक्क्यांपेक्षा जास्त भरले असून वारीकाळात पुराचा धोका आहे. घडलेल्या घटनेबाबत वैजनाथ पावले यांनी शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.
अलतगा गावावर शोककळा
बेळगाव : अलतगा (ता. बेळगाव) येथील एका तरुणाचा पंढरपुरात चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू झाल्याची बातमी गावात धडकताच गावावर शोककळा पसरली आहे. देवदर्शनासाठी गेलेल्या तरुणाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शुभम ज्ञानेश्वर पावले (वय 27) हा तरुण आपल्या मित्रांसमवेत गुरुवारी रात्री पंढरपूरला गेला होता. आठ जण गावातून देवदर्शनासाठी निघाले होते. शुभम फरशी फिटींगचे काम करीत होता. शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण पंढरपुरात पोहोचले. यापैकी पाचजण प्रातर्विधीसाठी गेले. तर शुभम अंघोळीसाठी चंद्रभागेच्या पात्रात उतरला.
नदीपात्रात बुडून या तरुणाचा मृत्यू झाला आहे. शुभमच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती समजताच ग्रा. पं. सदस्य चेतक कांबळे, देवस्थान पंचकमिटीचे सेक्रेटरी कल्लाप्पा चौगुले, चंद्रकांत धुडुम, वैजू चौगुले आदी गावकरी पंढरपूरला गेले. उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री शुभमचा मृतदेह अलतग्याला आणण्यात आला. शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आमदार रोहित पाटील यांचे सहकार्य मिळाले.









