देवाची पूजा करण्याची प्रथा सर्वत्र आहे. कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ गजानन किंवा अन्य देवतेला स्मरुनच केला जातो. तथापि, बिहारमध्ये एक गाव असे आहे, की जेथे देवतांची पूजा तर केली जातेच, पण त्याआधी राक्षसांचे पूजन केले जाते. या राज्याच्या सिवान जिल्ह्याच्या दरौली गावात ही प्रथा आहे. या गावाचा इतिहास काल-परवाचा नाही, तर हजारो वर्षांपूर्वीपासूनचा आहे, असे बोलले जाते. या गावाचे अस्तित्व महाभारत ज्या युगात घडले, त्या द्वापर युगातही होते, अशी नोंद आहे. त्यामुळे ही प्रथा प्राचीन असावी असे अनेक तज्ञांचे मत आहे.

पुराणकाळात बाणासूर नावाचा राक्षस होता. त्याचे मंदीर या गावात आहे. ते एखाद्या राक्षसाचे देशातील एकमेव मंदीर असावे, अशी मान्यता आहे. द्वापर युगात या गावात हा बाणासूर राक्षसराज काही काळ विश्रांतीसाठी वास्तव्यास होता. त्याची आठवण म्हणून येथे त्याचे मंदीर उभारण्यात आले. तेव्हापासून या गावात या राक्षसराजाची पूजा केली जाते. कोणत्याही देवाच्या किंवा देवीच्या पूजेच्या आधी पूजा करुन घेण्याचा मान या राक्षसराजाचा आहे. या गावातील तलावात बाणासूराने स्नानही केले होते. तो तलाव आजही अस्तित्वात आहे, असा विश्वास आहे. या गावाला ‘खुर्द’ असेही संबोधले जाण्याची प्रथा आहे, अशी माहिती देण्यात आली.
बाणासूराच्या मंदिराशेजारी, भगवान श्रीराम, सीतामाता, शनिदेव, मां काली, गणेश, गौरी तसेच भगवान शंकर या देव-देवतांचीही मंदिरे आहेत. मात्र, बाणासूराची पूजा केल्यानंतरच भक्त आणि भाविक त्यांच्या मंदिरांमध्ये जातात आणि पूजाअर्चा करतात. अशा प्रकारे या गावात देव आणि दानव यांचा एकत्र निवास असल्याने हे गाव प्रसिद्धीस पावलेले आहे. आता त्याची ख्याती भारतात आणि जगातही सर्वत्र पसरल्याने दूरवरुन भाविक येथे येतात.









