शहरातील वाहतूक, बॅरिकेड्सचा मुद्दा केला उपस्थित : उपाययोजना राबविण्याची केली मागणी
बेळगाव : बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मंगळवारी बेळगावचे पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले आहे. तसेच त्यांच्यासोबत बेळगाव शहरातील वाहतुकीशी निगडित मुद्दे अन् विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्सबद्दल शिष्टमंडळाने चर्चा केली आहे. पोलीस आयुक्तांनी या मुद्द्यांकडे लक्ष देण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. शहरातील सन्मान हॉटेल तसेच अन्य ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आल्याने निर्माण झालेले अडथळे तसेच समस्यांकडे शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. सार्वजनिक सुरक्षेचे महत्त्व आम्ही जाणतो, परंतु व्यवसाय तसेच लोकांची गैरसोय होईल अशाप्रकारचे पाऊल उचलले जाऊ नये. या बॅरिकेड्समुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. तसेच परिसरात अनेक शाळा असल्याने विद्यार्थी दुभाजक ओलांडण्यासाठी धोकादायक पद्धत अवलंबित आहेत. या स्थितीमुळे प्रवाशांना त्रास होत असून अपघात होण्याचा धोका असल्याचे बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सने निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांना सांगितले आहे. वाहनांद्वारे सुरळीतपणे ये-जा करण्यास या बॅरिकेड्समुळे अडथळे निर्माण झाले आहेत. सन्मान हॉटेलसमोरील बॅरिकेड्समुळे अत्यावश्यक सेवा म्हणजेच डॉक्टरांना तातडीच्या प्रसंगी वेळेत रुग्णालयात पोहोचणे कठीण झाले आहे. तर ग्लोब सिनेमासमोरील दुहेरी मार्ग ओलांडण्यासाठी बॅरिकेड्समुळे सिग्नलपर्यंत जावे लागत आहे. तर फर्स्ट गेट येथील बॅरिकेड्समुळे काँग्रेस रोडवर राँग साइड ड्रायव्हिंगचे प्रकार वाढले आहेत. या महत्त्वपूर्ण समस्येकडे वाहतूक पोलीस विभागाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांसमोर नमूद केले आहे.
अनावश्यक अडथळ्यांमुळे परिसरातील व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. पायी चालणाऱ्या लोकांकडून होणाऱ्या खरेदीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना याचा मोठा फटका बसला आहे. सुरक्षेशी तडजोड न करताना यावर पर्यायी तोडगा काढला जाणे गरजेचे असल्याचे म्हणत शिष्टमंडळाने काही उपाययोजना सुचविल्या आहेत. यात वाहतूक व्यवस्थापन योजना, मोबाईल बॅरिकेड्सचा वापर, स्पष्ट माहिती फलक आणि दिशादर्शक माहिती, व्यावसायिकांना प्रक्रियेत सामील करून घेणे असे उपाय बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सने सुचविले आहेत. शहराकरिता समग्र वाहतूक व्यवस्थापन योजना तयार केली जावी. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनांना योग्य मार्गांवर वळविण्यात यावे. आवश्यकता भासेल तेव्हा मोबाईल बॅरिकेड्स लावण्यात यावेत. यामुळे वाहतूक व्यवस्था अधिक लवचिक ठेवण्यास आणि वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे. पादचारी तसेच वाहनचालकांसाठी स्पष्ट माहिती देणारे फलक लावण्यात यावेत. संबंधित परिसरातील व्यावसायिकांशी संवाद साधून कुठल्याही अडथळ्याशिवाय वाहतूक सुरळीत ठेवण्याबाबत तोडगा काढला जावा, असे शिष्टमंडळाने निवेदनात नमूद केले आहे. या शिष्टमंडळात बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष पोरवाल, सचिव स्वप्नील शाह, व्यापार समिती अध्यक्ष संजय पोतदार, संचालक सी. सी. होंदडकट्टी, सतीश कुलकर्णी, सुधीर चौगुले, रोहित कपाडिया, शरद पाटील यांचा समावेश होता.









