पुणे / प्रतिनिधी :
मराठी नाटकात काम करतो, हे सांगणे अभिमानास्पद वाटावे, यासाठी मराठी नाटकांची पतप्रतिष्ठा वाढविणे, हे नाटय़परिषदेचा प्रमुख म्हणून आपल्यासमोरचे मोठे आव्हान असल्याचे रंगकर्मी व परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितले. राज्यातील नाटय़गृहे दुरूस्ती व देखभालीसाठी एकाच छताखाली असणे आवश्यक असून, त्याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय नाटय़परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रशांत दामले यांचा नाटय़ परिषदेच्या कोथरूड शाखेच्या वतीने ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी नाटय़परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, सहकार्यवाह समीर हंपी आणि सत्यजीत धांडेकर, कोषाध्यक्ष दीपक गुप्ते यांच्यासह अन्य उपस्थित होते.
दामले म्हणाले, राज्यात असलेल्या नाटय़गृहांपैकी 48 ठिकाणी नाटकांचे प्रयोग करता येतात. नाटय़गृहांमधील कमतरतांबाबत 28 थिएटर्सचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या नाटय़गृहांची देखभाल हे काम फारच जिकीरीचे असून ही सर्व नाटय़गृहे दुरूस्ती व देखभालीसाठी एकाच छताखाली असणे आवश्यक आहे. शासनाच्या अधिकाऱ्यांनीही आता हे मान्य केले आहे. त्यामुळे त्याबाबत लवकरच निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.
नाटकांबरोबरच टीव्ही, ओटीटी, चित्रपट अशी अनेक माध्यमे सध्या आली आहेत. मात्र, रंगभूमीवर अभिनय करणे सोपे नाही. प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले नाही, तर सरळ प्रेक्षकच कलाकाराला निवृत्त करतात. त्यामुळे मी नव्याने येऊ इच्छिणाऱ्यांना शिक्षण पूर्ण करा, मग या क्षेत्रात या, असे आवर्जून सांगत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अन्य राज्यांमध्ये एकांकिकांचे प्रयोग सुरू होणार
राज्य एकांकिका स्पर्धांमध्ये पहिल्या तीन आलेल्या एकांकिकांचे प्रयोग अन्य राज्यात करण्यासाठी विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. लवकरच असे प्रयोग पुन्हा अन्य राज्यात सुरू होतील, अशी माहितीही दामले यांनी दिली.
आळेकर म्हणाले, प्रशांत हा गेली अनेक वर्षे या रंगभूमीवर काम करत आहे. तो स्वत: नाटय़निर्माताही आहे. त्यामुळे त्याला नाटक या व्यवसायाची, उद्योगाची किंवा धंद्याची अंतर्बाह्य माहिती आहे. त्यामुळे नाटय़परिषदेचा अध्यक्ष म्हणून तो चांगले काम करू शकेल, असा मला विश्वास आहे.








