परमप्रिय अशा महाराष्ट्राचा आज स्थापना दिवस. महाराष्ट्र दिनी आणि मराठी राजभाषा दिवस. या महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला त्याचा विखंडित भूभाग आणि दूर लोटला गेलेला मराठी भाषिक, मराठी अभिमानी भाग आजही लवकरच एक होऊ या आस्थेने आणि जिद्दीने ठामपणे लढतो आहे. आस्मानी आणि सुल्तानीला बाणेदारपणाने उत्तर देत ठामपणाने, ताठकण्याने उभा आहे. ही महाराष्ट्राची मरहट्ठी शक्ती आणि प्रेरणा त्याच्या इतिहासातून आली आहे. सह्याद्रीच्या काळ्या पत्थरातून ती पाझरली आहे. सातपुड्यापासून समुद्रापर्यंत मराठी मुलुखात सर्वत्र काळाच्या उदरात खोल रुजलेली आणि कालपरत्वे उसळून उठणारी इथली स्वाभिमानाची उर्मी हे या भूमिचे वैशिष्ट्या. आपल्या लाघवी बोलीने इतरांच्या मनात रूजणारी इथली बोली समोरच्याच्या भाषेप्रमाणे बदलते आणि दिल्या-घेतल्याची चर्चा करते. हे आमचे वैशिष्ट्याही जगाने नोंदवून ठेवलेले. अशा आपल्या महान महाराष्ट्राच्या आधुनिक सीमारेषेतील स्वरुपाच्या वर्धापनदिनानिमित्त तमाम मराठी भाषिकांना शुभेच्छा. हा प्रांत आपले गतवैभव प्राप्त करो आणि आधुनिक प्रगती काळात सर्वबाबतीत अग्रेसर राहो या शुभेच्छा. आज महाराष्ट्र दिन आहे तसाच मराठी राजभाषा दिवसही आहे. राज्य स्थापनेच्या दिवसापासून त्याचीही अंमलबजावणी सुरु झाली आणि मराठी भाषिकांचे राज्य स्वातंत्र्यात अस्तित्वात आले. मात्र या मराठी राजभाषेचा अडीच हजार वर्षांपासून अस्तित्वाचा ज्ञात पुरावा असूनही अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकलेला नाही, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी अभिजात भाषा विषयक समितीने केंद्र सरकारकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सादर केलेल्या डॉ. रंगनाथ पठारे समितीच्या आणि डॉ. हरी नरके यांनी शब्दबद्ध केलेल्या अहवालाला यंदाच्या महिन्यात एक दशक पूर्ण होत आहे. 2013 च्या जानेवारीत सादर केलेला अंतरिम आणि मे महिन्यात सादर केलेला अंतिम अहवाल साहित्य अकादमीने डॉ. भालचंद्र नेमाडे समितीच्या अभिप्रायासह स्विकारुन मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारला सकारात्मकता दर्शवली. मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये ही मान्यता मात्र महाराष्ट्राला मिळालेली नाही. या अहवालाचे म्हणूनच आजच्या दिवशी हे स्मरण. केंद्राच्या निकषांच्या व मुद्यांच्या अनुषंगाने विचार करताना मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे हे पुराव्यानिशी सिद्ध होते. दहा वर्षापूर्वी ते सिद्ध करुनही मान्यता न मिळण्यात झारीतले शुक्राचार्य कोण? याचा शोध घेऊन त्यांच्या नजरेला इजा करण्याची वेळ आली आहे. वास्तविक प्राचीन महारट्ठी, मरहट्ठी भाषा, महाराष्ट्री प्राकृत भाषा, अपभ्रंश मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा असा मराठीचा प्रवास आहे. महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश आणि मराठी या तीन वेगवेगळया भाषा नसून ती एकाच भाषेची तीन रूपे आहेत. मराठीतला आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ ‘गाथासप्तशती’ हा सुमारे दोनहजार वर्षे जुना आहे. ‘लीळाचरित्र’ आणि ‘ज्ञानेश्वरी’ हे मराठी भाषा अतिशय प्रगल्भ झाल्यानंतरचे श्रेष्ठ ग्रंथ आहेत. भाषा काही एकाएकी प्रगल्भ होत नाही. ती तशी होण्यासाठी अनेक शतके जावी लागतात. हे जागतिक तोडीचे ग्रंथ आठशे वर्षापूर्वी ज्या भाषेत लिहिले गेले. ती त्याच्या आधी बारा-पंधराशे वर्षे अत्यंत समृद्ध भाषा होती याचे शेकडो शिलालेख, ताम्रपट, पोथ्या आणि हस्तलिखित प्राधिक पुरावे आज उपलब्ध झालेले आहेत. नाणेघाटातील ब्राम्ही लिपीतील 2220 वर्षांपूर्वीच्या शिलालेखातील ‘महारडीनो’ हा उल्लेख, विनयपीटक, दीपवंश, महावंश या ग्रंथातील महाराष्ट्राचे उल्लेख, हालसातवाहनाच्या गाथासप्तशतीतील श्रेष्ठ दर्जाचे मराठी काव्य, रामायण, महाभारत आणि गुणाढ्याच्या बृहत्कथेत येणारे असंख्य मराठी शब्द. वररुचीचे प्राकृतप्रकाश, हेमचंद्राची देशीनाममाला, शाकुंतल, मृच्छकटिकातील अनेक पात्रांच्या तोंडचे प्राचीन मराठीतील संवाद, जैन महाराष्ट्री साहित्याचा तिसरे ते अठरावे शतक इतका भाषाप्रवास यावरून मराठीची प्राचीनता निर्विवादपणे सिद्ध होते. पतंजली, कौटिल्य, टॉलेमी, वराहमिहीर, चिनी प्रवासी ह्युएन त्संग अल्बेरुनी यांचे लेखन आणि थोर संशोधक श्री. व्यं. केतकर, राजारामशास्त्राr भागवत, रावसाहेब वि. ना. मंडलीक, महापंडित राहुल सांकृत्यायन, डॉ. रा. गो. भांडारकर, डॉ. वेबर, डॉ. ए. एम. घाटगे, नारायण विष्णू बापट, वि. का. राजवाडे, इरावती कर्वे, कृ. पां. कुलकर्णी, दत्तो वामन पोतदार, वि. ल. भावे, शं. गो. तुळपुळे, अॅन फेल्डहाऊस, रा. भि. जोशी आदींच्या संशोधनाच्या आधारे आधुनिक दृष्टीतून एक सुसंगत आराखडा मांडायचा झाल्यास महारठ्ठी किंवा महाराष्ट्री म्हणजेच मराठी भाषा ही किमान अडीच हजार वर्षे जुनी असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. चक्रधर, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, वि.स. खांडेकर, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, भाऊ पाध्ये, भालचंद्र नेमाडे, नामदेव ढसाळ, मनोहर तल्हार, नारायण सुर्वे, मनोहर शहाणे आदींचे श्रेष्ठ लेखन आणि राजारामशास्त्राr भागवत, श्रीधर व्यंकटेश केतकर, शं. गो. तुळपुळे, ल. रा. पांगारकर यांनी मराठी भाषेच्या निर्मितीबाबत केलेले विवेचन पाहता सारांशाने असे म्हणता येते की प्राचीनता, मौलिकता, श्रेष्ठ साहित्याची परंपरा, भौगोलिक विस्तार या सर्व अंगांनी विचार करता मराठी ही अभिजात भाषा असून तिचे अभिजातपण स्वयंसिद्ध आहे. महाराष्ट्र या देशनामापेक्षा महाराष्ट्री भाषा जुनी आहे. अश्मक, कुंतल, अपरान्त, विदर्भ या प्रदेशात प्राकृत महाराष्ट्री प्रचारात होती. इतकेच नाही तर सातवाहनांच्या राजवटीत (इ.स.पूर्व 2 रे शतक ते इ.स. 2 रे शतक) त्यांचा राज्यविस्तार कुरुक्षेत्र, पेशावर इथपर्यंत झाल्यामुळे ती भारताच्या बऱ्याच मोठ्या भूभागात प्रचलित होती. म्हणूनच तिचे हस्तलिखित देशभर सापडते. मराठीला तिचा हक्क मिळून विकसित होण्याची आणि प्रसंगी या अन्याया विरोधात उभे राहण्याची शक्ती इतिहासातून मिळो याच सदिच्छा!
Previous Articleपाकचा न्यूझीलंडवर सात गड्यांनी विजय
Next Article सुदानमधून आणखी 365 भारतीय मायदेशी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








