खरवते येथील प्रकार, दोन गुरखे वनविभागाच्या ताब्यात
राजापूर वार्ताहर
वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी आंबा बागेत लावलेल्या फासकीत अडकून मृत झालेल्या बिबट्याला खड्ड्यात पूरून परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार राजापूर तालुक्यातील खरवते गावी उघडकीला आला आहे. बागेत काम करणाऱ्या गुरख्यांनी हे कृत्य केल्याचे समोर आले असून या प्रकरणी वनविभागाने चौकशी सुरू करत दोन गुरख्यांना ताब्यात घेतले आहे.
खरवते हेदाडवाडी येथे हा प्रकार घडला असून ज्या खड्डयात या बिबटयाला पुरण्यात आले होते तो खड्डा पुन्हा खोदून मृत बिबटयाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. बिबट्याचा मृतदेह पुर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. सुमारे 15 दिवसापुर्वी या बिबट्याचा मृत्यू झालेला असावा अशी माहिती रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांनी दिली आहे.









