वार्ताहर /सांबरा
मुचंडी (ता. बेळगाव) येथे गुरुवारी आयोजित महादौडीमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून एकीचे दर्शन घडविले .या भागामध्ये प्रथमच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान पूर्व विभागातर्फे महादौडीचे आयोजन करण्यात आले होते. येथील श्री सिद्धेश्वर मंदिरासमोर सकाळी सात वाजता कणबर्गी, कलखांब, मुचंडी,अष्टे ,चंदगड व खणगाव येथून आलेल्या सर्व दुर्गामाता दौड एकत्र आल्या. यावेळी परमपूज्य श्री हरी गुरु महाराज यांनी युवकांना मार्गदर्शन केले. आजचा युवक हा व्यसनी बनू लागला आहे यासाठी युवकांनी निर्व्यसनी बनून शरीर संपदा कमविली पाहिजे तरच आम्ही हिंदू धर्माचे रक्षण करू शकतो. शिवरायांचे विचार आचरणात आणले तरच आमच देव, देश व धर्माचे रक्षण होईल. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रचारक हिरामणी मुचंडीकर म्हणाले की, गो-मातेचे रक्षण करणे काळाची गरज असून यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. श्री दुर्गामाता दौडीच्या माध्यमातून सध्या प्रत्येक युवकाच्या मनात राष्ट्राभिमान जागवण्याचे कार्य सुरू आहे. हिंदूंनी संघटित होणे काळाची गरज आहे. महादौडीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते शेवटी ध्येयमंत्राने दौडची सांगता करण्यात आली.









