शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
दोडामार्ग – वार्ताहर
लंपी आजारामुळे कोलझर येथील शेतकरी लक्ष्मण शंकर बोंद्रे यांची एक दुभती गाय दगावल्यामुळे खळबळ उडाली असून अन्य जनावरेही लंपी बाधित असल्यामुळे कोलझर परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये गुरांना होणाऱ्या लंपी आजाराने थैमान घातले आहे. या आजारामुळे गुरे दगावत आहेत. अशा परिस्थितीत या दुभत्या गायीचा या आजाराने मृत्यू झाल्याने या भागातील शेतकऱ्यांमधे भितीचे वातावरण आहे. लंपी आजारापूर्वी लसीकरण झाल्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला नाही. या आजारामध्ये वेळेवर उपचार झाले नाही तर गुरे दगावण्याचा संभव असतो. यापूर्वी या भागात किरकोळ गुरांना या आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. त्यानंतर काही गुरांना लसीकरण करण्यात आले होते. तरीही या आजाराची श्री. बोंद्रे यांच्या गुरांना लागण झाल्याने त्यांनी तात्काळ पशू वैद्यकीय अधिकारी यशवंत वझरेकर यांना याबाबत कल्पना दिली. श्री. वझरेकर यांनी सर्व गुरांची तपासणी करून त्यांच्यावर उपचारही सुरू केले आहेत. तसेच कोलझर पंचक्रोशीतील इतर गुरांवर देखील लसीकरण करण्यात आलेले असल्याचे श्री. वझरेकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान शासनाने लंपी आजारामध्ये दगावणाऱ्या गुरांच्या मालकांना मोबदला देण्याचे जाहीर केले असुन या दगावलेल्या गायीच्या मालकाला त्वरीत मोबदला मिळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तात्काळ शासन दरबारी प्रस्ताव पाठवावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.









