ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील नऱ्हे परिसरात राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचे दारूच्या नशेत पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात त्याने पत्नीवर पिस्तूल रोखले. त्यावेळी ”आईला मारु नका पप्पाsss!” अशी विनवणी करत आठ वर्षांची मुलगी मध्ये आली. त्यावेळी निर्दयी बापाने कोणताही विचार न करता थेट मुलीवरच गोळी झाडली. यात मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राजनंदिनी पांडुरंग उभे असे जखमी मुलीचे नाव आहे. याप्रकरणी पांडुरंग तुकाराम उभे (वय. 38, रा. रुद्रांगण सोसायटी नऱ्हे, पुणे) याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.
अधिक वाचा : पुण्यात मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा
मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग उभे हा बांधकाम व्यावसायिक आहे. त्यातूनच त्याने परवाना असलेले रिव्हॉल्वर घेतले आहे. सध्या व्यवसाय मंदीमध्ये असल्याने तो आर्थिक विवंचनेत होता. त्याला दारुचे व्यसन आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पांडुरंग उभे हा दारुच्या नशेत घरी आल्यानंतर पत्नी व घरातील इतरांसोबत किरकोळ कारणावरून वाद घालू लागला. तुमच्यामुळे मला बाहेरच्या लोकांचा मार खावा लागतो. आज तुम्हाला संपवून टाकतो, असे म्हणत त्याने कमरेला लावलेलं परवानाधारक पिस्तूल बाहेर काढले व पत्नीकडे जिवे मारण्यासाठी रोखले. आईचा जीव धोक्यात असल्याचे पाहून आठ वर्षांची राजनंदिनी ओरडत आली. आईला नका ना मारु पप्पा!, अशी विनवणी तिने पित्याकडे केली. मात्र, चिमुकलीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून निर्दयी बापाने कोणताही विचार न करता राजनंदिनीवर गोळी झाडली. ती गोळी राजनंदिनीच्या छातीच्या डाव्या बाजूला लागली. ती जागीच कोसळली. यावेळी अचानक गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारचे तातडीने तेथे आले. त्यांनी रक्ताच्या थोराळय़ात पडलेली राजनंदिनीला पाहून लगेचच भारती रुग्णालयात नेले. तेथे तिच्यावर उपचार सुरु आहेत. अधिक तपास सिंहगड पोलीस करत आहेत.









