माजी नगरसेवक संघटना घेणार प्रादेशिक आयुक्तांची भेट
बेळगाव : महानगरपालिकेमध्ये सुरू असलेल्या सत्ता संघर्षामुळे मनपा सभागृहाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. तर शहराच्या प्रथम नागरिक असणाऱ्या महापौरांवर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आल्यामुळे शहरवासियांसाठी ही अत्यंत अशोभनीय बाब आहे, असे माजी महापौर व माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष अॅड. नागेश सातेरी यांनी सांगितले. चव्हाट गल्ली येथील माऊती मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या माजी नगरसेवक संघटनेच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. महानगरपालिकेमध्ये इतिवृत्ताची फाईल गायब झाल्यामुळे सत्तासंघर्ष पेटला आहे. यामुळे महापौरांवर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. सध्याच्या सभागृहामध्ये नगरसेवक व महापौरांना आपल्या अधिकारांची जाणीव नसल्यामुळे अधिकारी शिरजोर होत आहेत. अधिकाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींची दिशाभूल करण्यात येत आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी अस्तित्वहीन झाल्यानेच अधिकारी आपला स्वार्थ साधत आहेत. यामुळेच घडलेल्या प्रकाराने महापौरांवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. महापौरांनी पत्रकार परिषद घेतली असली तरी त्यामधूनही नेमका विषय स्पष्ट झालेला नाही. फाईल गायब झाल्याचा आरोप-प्रत्यारोप होत आहे. महापौरांवरील गुन्हा ही अशोभनीय बाब आहे. आपणही सभागृहात कामकाज केले आहे. त्यामुळे सभागृहाचा मान राखून कामकाज करणे गरजेचे आहे. शहरवासियांच्या समस्या सोडविण्यासाठी निवड करण्यात आलेल्या नगरसेवकांनी प्राधान्य दिले पाहिजे. राजकारण केले जाऊ नये, असे सातेरी यांनी सांगितले.
मनपात घडणाऱ्या सर्व घडामोडी पाहिल्या असता लवकरच प्रादेशिक आयुक्तांची भेट घेऊन मनपामध्ये लक्ष घालण्यासाठी विनंती करण्यात येणार आहे. नगरसेवकांना वगळता इतर लोकप्रतिनिधींकडून मनपामध्ये ढवळाढवळ करणे योग्य नाही. शहरवासियांच्या समस्या सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी लवकरच माजी नगरसेवक संघटनेची पुनर्रचना करण्यात येणार आहे, असे अॅड. सातेरी यांनी सांगितले. माजी आमदार रमेश कुडची बोलताना म्हणाले, आपण नगरसेवक, महापौर व आमदार म्हणून काम केले आहे. मात्र मनपाच्या कामकाजात कधीही ढवळाढवळ केली नाही. मनपा कामकाजात हस्तक्षेप करणे ही चुकीची बाब आहे. शहराच्या प्रथम नागरिकांवर गुन्हा दाखल होणे ही अवमानास्पद बाब आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेविका रेणू किल्लेकर, सरिता पाटील, शिवाजी सुंठकर, मालोजी अष्टेकर, लतीफखान पठाण, यल्लाप्पा कुरबर आदी माजी नगरसेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.









