लांजा प्रतिनिधी
शिपोशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शासकीय निवासस्थानी आरडाओरडा करत निवासस्थानाचा दरवाजा लाथेने तोडून परिचारिका असलेल्या पत्नीला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी नवऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 1 ऑक्टोबर रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास शिपोशी येथे घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, याबाबतची तक्रार सुप्रिया एकनाथ यादव (31, धावणेवाडी – लांजा) हिने लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे. सुप्रिया यादव आणि नवरा सागर रघुनाथ वावरे (कोल्हापूर) हे एक वर्षापासून विभक्त राहत आहेत. पत्नी सुप्रिया यादव हिने घटस्फोटासाठी ऑक्टोबर 2023 मध्ये रत्नागिरी कोर्टात दावा दाखल केला असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
सुप्रिया ही शिपोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून काम करते. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास नवरा सागर वावरे याने शिपोशीतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शासकीय निवासस्थानाचा दरवाजा लाथेने तोडून नुकसान केले. त्याचप्रमाणे पत्नी सुप्रिया हिला मारहाण करून शिवीगाळ आणि दमदाटी केली. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात सागर वावरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.