गोवा एक्स्प्रेस अडकली, प्रवासी-पर्यटकांचे हाल
बेळगाव : कोकणसह पश्चिम घाटात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे रविवारी सायंकाळी 6 च्या सुमारास दूधसागर-सोनावळी रेल्वेमार्गादरम्यान दरड कोसळली. यामुळे वास्को- निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस सोनावळी रेल्वेस्थानकात थांबविण्यात आली. रात्री उशिरापर्यंत दरड हटविण्याचे काम सुरू असल्याने दूधसागर धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांचे व पर्यायाने प्रवाशांचेही हाल झाले. रविवारी दुधसागर, कॅसलरॉक परिसरात मुसळधार पाऊस झाला. सायंकाळी टनेल क्र. 12 नजीक दरड कोसळली. दरड कोसळून मोठे दगड रेल्वे रस्त्यावर आल्याने रेल्वेवाहतूक ठप्प झाली. हा संपूर्ण घाट परिसर असल्याने दरड हटविण्याचे कामाला वेळ लागत होते. नैऋ=त्य रेल्वेचा इंजिनिअरींग विभाग दरड हटविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कार्यरत होता.
गोवा एक्स्प्रेस उशिराने बेळगावमध्ये दाखल
रविवार असल्याने बंदी असतानाही हजारो पर्यटक दूधसागर येथील धबधबा पाहण्यासाठी गेले होते. हे पर्यटक गोवा एक्स्प्रेसने लोंढा, बेळगावकडे येण्यास निघाले. परंतु दरड कोसळल्याने ही एक्स्प्रेस मध्यरात्री बेळगावमध्ये दाखल झाल्याने पर्यटकांचे हाल झाले.
दुधसागर- सोनावळी दरम्यान रविवारी सायंकाळी दरड कोसळली. रेल्वेच्या इंजिनिअरींग विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
अनिश हेगडे (जनसंपर्क अधिकारी, नैऋ=त्य रेल्वे)









