गेल्यावर्षाची पुनरावृत्ती झाल्याने नागरिकांसह वाहनचालकांत भीतीचे वातावरण : कंत्राटदारासह सरकारचा बेजबाबदारपणा
पेडणे : धारगळ येथे राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळून गेल्या वर्षाची यंदा पुनरावृत्ती झाली आहे. यातून कंत्राटदार आणि संबंधित बांधकाम खाते व सरकारी यंत्रणा सामान्य लोकांच्या जीवाशी खेळ करत आहे की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. वर्षभरात सरकारने कोणतीच उपाययोजना न केल्यामुळे हा प्रकार पुन्हा घडला. यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक रोहिदास हरमलकर यांनी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग 66 मागच्या दोन दिवसापासून मालपे बायपास महामार्गावर दरड कोसळण्याची ताजी घटना असतानाच 2 रोजी धारगळ महाखाजन येथे ज्या ठिकाणी गेल्या वषी मोठ्या प्रमाणात दरड कोसळून एकेरी मार्ग बंद झाला होता. त्याच ठिकाणी पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाली आहे. दरड कोसळलेल्या परिसरात कंत्राटदाराने बॅरल लावून त्या ठिकाणी पट्ट्या लावलेल्या आहेत. याठाकाणी पुन्हा दरड कोसळण्याचा धोका आहे. राष्ट्रीय महामार्गा बांधण्याचे कामे एम.व्ही.आर या ठेकेदार कंपनीकडे आहे. या महामार्गाचे काम करत असताना कंत्राटदार मनमानी करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत त्याचे परिणाम सर्वसामान्य वाहन चालक नागरिकांना भोगावे लागत आहे. या कंत्राट दारावर सरकारच्या कसल्याच प्रकारचा अंकुश नसल्यामुळे त्याची मनमानी दिवसेंदिवस वाढत आहे.
अर्धा अधिक डोंगर कोसळण्याची भीती!
गेल्या वषी ज्या पद्धतीने कंत्राटदाराने या रस्त्याच्या बाजूचा डोंगर उभा कापला होता. उतरणी पद्धतीने कापला असतात तर अनर्थ टळला असता. परंतु कंत्राटदार मनमानी पद्धतीने आपल्याला हवे तसे काम करत आहे. रविवारी महाखाजन धारगळ येथे सलग दुसऱ्या वषी दरड कोसळण्याचा प्रकार घडला. त्या भागातील अर्धा अधिक डोंगर कोसळण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. केव्हाही डोंगराची दरड पुन्हा पुन्हा कोसळून मोठी दुर्घटना ही घडू शकते. रात्रीच्यावेळी जर अचानक भर पावसात दरड कोसळली तर वाहन चालताना बराच त्रास होऊ शकतो.
पाण्याच्या टाकीला धोका
दरम्यान डोंगरावर एक सार्वजनिक बांधकाम खाते पाणी विभागाची पाण्याची टाकी आहे. त्या पाण्याच्या टाकीलाही धोका संभवत आहे. यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे. गेल्यावर्षी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर सार्वजनिक बांधकाम खाते राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन कंत्राटराला महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. मात्र त्याचे पालन झाले नाही.
गेल्यावर्षीची नुकसान भरपाई अद्याप नाही!
दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 66 हा अत्यंत धोकादायक स्थितीत बनलेला आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची शक्मयता आहे. पोरस्कडे येथील ज्या ठिकाणी काजूची बागायत आहे, त्या ठिकाणी मोठमोठे दगड धोंडे काजू बागायतीत जाऊन काजूंची झाडांची नासाडी झालेली आहे. यावरही कंत्राटदाराने आजपर्यंत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिलेली नाही. मालपे बायपास येथे ज्या पद्धतीने दरड कोसळते त्याच पद्धतीने महाखान धारगळ येथे दरड कोसळत आहे.









