दोन घरांना धोका, कधीही पडू शकतात
प्रतिनिधी/ म्हापसा
राजवाडा म्हापसा सकल भागात जनता हायस्कूलजवळ जाणाऱ्या डोंगराळ भागातील दरड पहाटे कोसळल्याने येथील भागातील वीज खांबे तुटून खाली पडले. यामुळे या भागाचा रस्ता पूर्णत: वाहतुकीस बंद झाला. ही घटना पहाटे घडल्याने सुदैवाने प्राणहानी टळली. विशेष म्हणजे राजवाडा टेकडीवर डोंगराळ भागाला लागूनच दोन घरे असल्याने पावसाने जोर धरल्यास ही घरे कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी कृष्णा पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिकारी अशोक परब यांनी घटनास्थळी धाव घेऊन काही झाडे बाजूला करण्याचे काम केले.
सकाळी घटनेची माहिती म्हापसा नगरपालिकेला दिल्यावर नगराध्यक्षा प्रिया मिशाळ तसेच स्थानिक वॉर्ड क्रमांक 20 चे नगरसेवक प्रकाश भिवशेट घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पाहणी केली. आपण याबाबत पालिका निरीक्षकांना याची तपासणी करण्यास सांगितले असून म्हापसा उपजिल्हाधिकारी, मामलेदारांनी येथे येऊन घटनेची तपासणी करावी असे नगराध्यक्ष म्हणाल्या. दरम्यान राजवाडा येथे टेकडीवर असलेली दोन घरे कायदेशीर आहेत काय? हे माहीत नाही मात्र ही घरे डोंगराळ भागात टेकडीच्या कडेवर असून पावसामुळे दरड कोसळून ती खाली येण्याची शक्यता असल्याने मामलेदारांनी त्या घरातील माणसांना सध्या तरी अन्यत्र स्थलांतरीत करावे असे नगरेसवक प्रकाश भिवशेट म्हणाले. दहा वर्षांपूर्वी याच भागातील भली मोठी दरड कोसळून खाली असलेल्या दाभाळे कुटुंबातील वयोवृद्ध जागीच ठार झाला होता त्याची आठवण यावेळी ताजी झाली.
म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी कृष्णा पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली उपअधिकारी अशोक परब, जवान गोविंद देसाई, परेश मांद्रेकर, प्रवीण नाईक गावकर यांनी घटनेकडे धाव घेऊन झाडे बाजूला केली.









