परसातील भात, नाचणा पिकांचे नुकसान : बंदोबस्त करण्याची मागणी
वार्ताहर /जांबोटी
चिखले तालुका खानापूर येथे गेल्या चार दिवसापासून गव्यांनी धुमाकूळ घातला असून सदर गवे सायंकाळच्या वेळी चक्क गावात घुसून परसातील पिकांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांसह शेतकरी वर्गात घबराट पसरली असून वनखात्याने या गव्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे भीमगड अभयारण्याच्या व्याप्तीत येणाऱ्या चिखले गावात बिबटे, अस्वल, वाघ, गवे आदी जंगली प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला असल्यामुळे शेतकरीवर्ग तसेच ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन दिवस कंठावे लागत आहेत. शनिवारपासून चिखले गावात दोन गव्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.
सदर गव्यांचे वास्तव्य चिखले-पारवाड रस्त्यानजीकच्या जंगलात असून ते राजरोसपणे गावात प्रवेश करतात. सायंकाळी सात वाजल्यानंतर ते गावात घुसून परसातील व शेतवडीतील भात, नाचणा तसेच इतर पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत फस्त करीत असल्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल बनले आहेत. गेल्या चार दिवसापासून चिखले गावात ठाण मांडलेल्या गविरेड्यांनी धुमाकूळ घालून संजय पाटील, ऊपेश पाटील, संभाजी गावडे, नारायण कळेकर, गणपती गावडे, चंद्रकांत गावडे आदींच्या भात, नाचणा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. शेतकरीवर्ग रात्रीच्या वेळी गव्यांना हुसकावण्यासाठी फटाके व बॅटऱ्यांचा प्रकाशझोत आदी उपाययोजना करीत असले तरी मस्तवाल गव्यांचे कळप शेतकऱ्यांच्या कोणत्याच प्रतिकाराला जुमानत नसल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. तरी कणकुंबी विभागाच्या वनक्षेत्रपालांनी लक्ष घालून चिखले गावात धुमाकूळ घालणाऱ्या गव्यांचा बंदोबस्त करावा व नुकसानीची पाहणी करून शेतकरीवर्गाना आर्थिकभरपाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.









