चिंदर सडेवाडी येथील घटना
आचरा प्रतिनिधी
चिंदर- सडेवाडी येथे गुरुवारी सकाळच्या सुमारास तुटलेल्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून दत्तात्रय(जयेश) गोसावी यांची गाय जागीच गतप्राण झाली. तर माळरानवर फिरणारे दोन कोल्हेही जागीच गत प्राण झालेले आढळून आले आहेत. याबाबतची ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर विजवितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. घडलेल्या घटनेमुळे ग्रामस्थांनी हजर झालेल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. या दुर्घटनेमुळे गोसावी यांना आर्थिक फटका बसला असून पावसाच्या या हंगामात गाय दगावल्याने आर्थिक संकट ओढवले आहे.
चिंदर सडेवाडी येथील दत्तात्रय (जयेश ) गोसावी हे शेतकरी कुटुंबातील असून शेतीवर कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. गुरुवारी सकाळी चिंदर सडेवाडी माळरानवर ते आपली गुरे चारायला घेऊन गेले होते. माळरानवर आले असता गु्रांमध्ये पुढे चालणारी गाय अचानक जमिनीवर पडून ओरडून तडफडू लागली. गोसावी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी पुढे धाव घेतली असता गाय वीज खांबावरून तुटून पडलेल्या तारेत अडकून तडफडत असल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत मागे गेले व बाकीच्या गुरांनाही मागे परतवले. काही क्षणातच त्यांच्या डोळ्यादेखत गाय गतप्राण झाली. घटनेची खबर गोसावी यांनी ग्रामस्थांना देत विद्युत प्रवाह बंद करण्यास सांगितले. दुर्घटना समजताच चिंदर सरपंच दिपक सुर्वे, सदस्य देवेंद्र हडकर दाखल झाले होते. त्यांनी गोसावी यांना धीर देत तात्काळ वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना तात्काळ हजर होण्यास सांगितले. घटनेची खबर मिळताच आचरा विद्युत मंडळाचे सहाय्यक अभियंता अनिल मठकर, परब, बांगर आदी उपस्थित झाले. आचरा पशुवैद्यकीय डॉ मिलिंद कांबळी हेही दाखल झाले होते.
विजेच्या धक्क्याने रात्री फिरणारे कोल्हेही झालेत गतप्राण
माळरानवर तुटलेल्या विद्युत भारीत वाहिनीचा चिकटून चिंदर साडेवाडी येथील दत्तात्रय गोसावी यांची गाय गतप्राण झाली होती त्याठिकाणी लागतच दोन कोल्हे वीज वाहिनीचा धक्का लागून गत प्राण झालेले आढळून आलेत. माळरानवर कोल्हे हे रात्रीचे फिरतात आणि हे कोल्हे विजेचा शॉक लागून गत प्राण झालेले असल्याने ही वीज वाहिनी रात्रीपासूनच तुटून पडलेली असावी असा अंदाज ग्रामस्थांनी वर्तवला.
ग्रामस्थांनी वीज अधिकाऱ्यांना धरले धारेवर
विद्यूत मंडळाचे सहाय्यक अभियंता अनिल मठकर हे दाखल झाल्यावर चिंदर ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. या वीज वाहिनीला जर माळरानावर फिरणारा शेतकरी चिकटला असता तर त्याला जबाबदार कोण? वाहिनीला चिकटून गाय मृत झाली . रात्री फिरणारे कोल्हेही चिकटून मेलेत म्हणजेच ही प्रवाहरहित वाहिनी काल रात्रीपासून तुटून पडून आहे आणि याची वीज वितरणला साधी जाग नाही. आपण लोक मारण्याची वाट बघत आहात का असा सवाल उपस्थित ग्रामस्थांकडून करण्यात आला. चिंदर सडेवाडीसाठी असलेल्या वायरमनची बदली झाल्यानंतर या भागासाठी वायरमनच नाहीय . कोणतीही घटना घडली तर लाईट बंद कोण करणार हा भाग गेले कित्येक दिवस विजवितरण ने वाऱ्यावर सोडला असल्याचा आरोप सरपंच सुर्वे यांनी केला. ग्रामपंचायत वीज वितरणला वाहिन्यांवर आलेली झाडी तोडण्यासाठी सहकार्यास तयार असतानाही विजवितरण कोणतीही कार्यवाही करत नाही म्हणूनच अशा घटना होत असल्याचा सरपंच सुर्वे यांनी सांगितले.









