पाळोळे – काणकोण येथे घडलेली घटना : मयत युवक – युवती मूळ उत्तर प्रदेशातील
काणकोण : पाळोळे समुद्रकिनाऱ्यावर व्हेलेंटाईन डे साजरा करण्यासाठी आलेल्या मूळ उत्तर प्रदेश येथील प्रेमी युगुलाचा समुद्रात बुडून मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना काल मंगळवारी 14 रोजी होवरे, पाळोळे येथे घडली. काणकोणच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत युवतीचे नाव सुप्रिया राजेश दुबे (वय 26 वर्षे), तर मयत युवकाचे नाव विभू शर्मा (27 वर्षे) असे आहे. सुप्रिया ही बेंगळुरूमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कामाला, तर विभू हा मुंबईत अभिनय क्षेत्रात कार्यरत होता. दोघेही एकमेकांच्या चांगल्या परिचयाचे व नात्यात होते. रविवार 12 रोजी त्यांच्याबरोबर आलेले अन्य एक जोडपे त्यांना पाळोळे येथे सोडून वार्का येथे राहायला गेले होते. रविवारी सुप्रिया व विभू यांनी पाळोळे येथे एका हॉटेलात वास्तव्य केले. सोमवारी सदर हॉटेल सोडून दुसऱ्या हॉटेलात दोघेही राहायला गेली होती. सोमवारी मध्यरात्रीपर्यंत दोघांनीही मौजमजा केली, हॉटेलात जेवण घेतले.
दारुच्या नशेत उतरले समुद्रात
रात्रीच्या जेवणानंतर दारूच्या नशेत समुद्रात आंघोळीसाठी उतरल्यावेळी प्रथम युवती पाण्यात बुडाली असावी आणि तिला वाचविण्यासाठी ज्यावेळी युवक पाण्यात उतरला त्यावेळी तो देखील समुद्रात बुडाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कारण मध्यरात्री किनाऱ्यावरून ‘हेल्प, हेल्प’ असा आलेला आवाज एका परदेशी महिलेने ऐकला होता, अशी माहिती काणकोणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी दिली.
सकाळी, दुपारी साडपले मृतदेह
सकाळी पाळोळे किनाऱ्यावर ज्या ठिकाणी सदर युवतीचा मृतदेह आढळला त्या ठिकाणाहून 20 मीटर अंतरावर तिची चपले व मोबाईल पडलेला होता. तिच्या मोबाईलवरून तिची सगळी माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर दुपारी 12.30 च्या दरम्यान पाळोळे येथील जीवरक्षकांना एका परदेशी महिलेने पाण्यात मृतदेह असल्याची माहिती दिली. तो मृतदेह विभूचा असल्याचे स्पष्ट झाले. सदर युवकाचे एक चप्पल किनाऱ्यावर होते आणि दोन्ही हात मदतीसाठी गेल्याप्रमाणे दिसत होते. मोबाईलवरून सापडलेल्या माहितीच्या आधारे मयत युवक व युवतीच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आलेली असून दोन्ही मृतदेह सध्या मडगावच्या जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. आज बुधवार दुपारपर्यंत दोघांचेही नातेवाईक गोव्यात पोहोचणार असून शवचिकित्सेनंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येतील, अशी माहिती निरीक्षक गावस यांनी दिली. उपअधीक्षक संदेश चोडणकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती समजून घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक चंद्रकांत गावस पुढील तपास करत आहेत.









