खर्च वाचत असल्याचा दावा
प्रत्येकाची स्वतःच्या आयुष्यातील समाधानाची व्याख्या वेगळी असते. कुणाला निसर्गात राहून शांतता लाभते, तर कुणाला दूरवर फैलावलेले पाणी पाहून आनंद मिळतो. परंतु काही दिवस अशा वातावरणात राहून लोक स्वतःच्या दिनचर्येत परत असतात, पण एका जोडप्याने स्वतःच्या आनंदासाठी सरोवरातच राहण्याची व्यवस्था केली आहे.
27 वर्षीय सराह स्पिरो आणि तिचा प्रियकर 40 वर्षीय ब्रँडन जोन्स यांनी शहरातील स्वतःचे घर सोडून सरोवरात वास्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. एप्रिल 2021 पासून ते एका छोटय़ाशा तरंगत्या घरात राहत आहेत. येथून परतण्याची त्यांची इच्छा नाही, कारण येथील वास्तव्य त्यांच्यासाठी कमी खर्चिक आहे.

वाढणारे घरभाडे पाहता लोक चांगले राहणीमान मिळविण्याचे मार्ग शोधत असतात. एका अशाच बुद्धिमान जोडप्याने वार्षिक खर्च वाचविण्यासाठी भाडय़ाचा फ्लॅट सोडून छोटय़ा फ्लोटिंग केबिनमध्ये स्थलांतरित होणे उत्तम समजले. 2021 मध्ये सराह आणि ब्रेंडन यांनी उत्तर कॅरोलिनाच्या फॉन्टना सरोवरातील वन बेडरुम हाउसबोटमध्ये राहण्यास सुरुवात केली. येथील त्यांचे वर्षभराचे भाडे शहरातील फ्लॅटच्या तुलनेत खूपच कमी आहे.
वर्षाकाठी आम्हाला 22 लाख रुपयांचा लाभ होतोय आणि आम्ही मनपसंत जागी देखील राहतोय. पूर्वी आम्ही दर महिन्याला अडीच लाख रुपयांचे घरभाडे देत होतो, तर आता वर्षभरासाठी आम्हाला अडीच लाख रुपये खर्च करावे लागत आहेत. हाउसबोट खरेदी केलयावर सुमारे 24 लाख रुपयांद्वारे त्याचे नुतनीकरण केल्याचे या जोडप्याकडून सांगण्यात आले.









