विटा प्रतिनिधी
येथील खानापूर रस्त्यावरील कालव्यावर अल्पवयीन मुलाकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस पोलिसांनी पकडले. ही घटना शनिवारी १७ जून रोजी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची विटा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, रात्र गस्त सुरू असताना येथील खानापूर रस्त्यावरील महाविद्यालयाच्या परिसरात पिस्तूल बाळगणारा संशयीत विक्रीसाठी घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार विटा पोलिसांच्या पथकाने येथील खानापूर रस्त्यावरील कॅनॉलवर पाहणी केली असता एक अल्पवयीन मुलगा आढळून आला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस आढळून आले. त्याचबरोबर त्याच्याकडील दुचाकी असा एकुण ९५ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
ही कारवाई पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक पांडुरंक कन्हेरे यांच्या नेतृत्त्वाखालील अमर सुर्यवंशी, सुरेश भोसले, सचिन खाडे, महेश देशमुख, राजेंद्र भिंगारदेवे, शशिकांत माळी, अक्षय जगदाळे, महेश संकपाळ यांच्या पथकाने केली. या प्रकरणी अमर सुर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.








