ज्ञानेश्वरीतील भक्तीयोगाबाबत प्रा. राजा माळगी यांचे वक्तव्य
वार्ताहर/ नंदगड
तेराव्या शतकात बिघडलेला धर्म वाचवण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी भगवतगीतेचे रुपांतर मराठीत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून केले. लोकांना भक्ती मार्गातून सुखाचा मार्ग दाखविला. त्यामुळे भक्ती मार्गात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. माणसाच्या आचार, विचारात सुसंस्कृतपणा आला. बऱ्याच प्रमाणात माणसे वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून एकत्र येऊ लागली. अन् दिवसेंदिवस भक्तीयोगाचे महत्त्व वाढू लागले, असे वक्तव्य वाळवा (सांगली) येथील क्रांतिसिंह नाना पाटील कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक राजा माळगी यांनी ज्ञानेश्वरीतील भक्तीयोग या विषयांवर व्याख्यान देताना संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात केले.
प्राध्यापक माळगी पुढे म्हणाले, तेराव्या शतकात माणसं भरकटलेली होती. त्यावेळी 1290 मध्ये, महानुभावानी लीला चरित्रमध्ये त्या काळाचे वर्णन केलं होतं. त्या काळामध्ये सर्व माणसे भरकटली होती. धर्माचा धंदा झाला. त्यावेळी धर्म वाचवण्यासाठी पुन्हा देवाला मानवी अवतार घ्यावा लागला.
ज्ञानेश्वरीचे वाचन जरुर करा
तेराव्या शतकामध्ये बिघडलेल्या सांस्कृतिक समाजाने धर्म व्यवस्थेची सुधारणा करण्यासाठी माउलीने आळंदीमध्ये जन्म घेतला. त्यावेळी त्यांनी भगवत गीतेवर ज्ञानेश्वरी लिहिली. पुढील तीनशे वर्षानंतर तुकोबारायांनी आम्हाला ज्ञानमार्ग सांगितला. प्रपंचातून परमार्थ करण्याची शिकवण संतानी दिली आहे. पंढरपूरला संत मंडळी जाऊन आली तर आजही त्यांच्या पायाची धूळ येथील लोक कपाळाला लावतात. माणसानी सुखी व्हायचे असेल तर ज्ञानेश्वरीच्या हट्टीयोग, ज्ञानमार्ग, कर्मयोग, भक्तीयोग समजून घेण्यासाठी ज्ञानेश्वरीचे वाचन जरुर करावे. माणूस भक्तीच्या माध्यमातून निर्भय होतो हे सांगण्यास ते विसरले नाहीत.









