मोबाईल टॉवरला विरोध केल्याने घटना : दोघे ताब्यात
बेळगाव : मोबाईल टॉवरला विरोध केल्याने नगरसेवकावर रॉडने हल्ला करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी भाग्यनगर 9 वा क्रॉस परिसरात ही घटना घडली असून या प्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. अभिजित जवळकर (वय 41 रा. भाग्यनगर) या वॉर्ड क्र. 42 च्या नगरसेवकांवर हल्ला झाला आहे. जखमी अभिजित यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. मारहाण करणाऱ्यांना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी भाजप नगरसेवकांनी टिळकवाडी पोलीस स्थानकासमोर धरणे धरले. खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळ्ळूर, टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशराम पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाग्यनगर येथील रमेश पाटीलसह दोघा जणांना ताब्यात घेतल्यानंतर नगरसेवकांनी आपले धरणे मागे घेतले. रात्री उशिरापर्यंत टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. भाग्यनगर येथील एका इमारतीवर मोबाईल टॉवर बसविण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध होता. गुरुवारी दुपारी नगरसेवकांनी मोबाईल टॉवरला विरोध केल्यामुळे झालेल्या वादावादीनंतर रॉडने मारहाण करण्यात आली. टिळकवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.









