मेरी माटी मेरा देश अभियानाचे औचित्य
मालवण : प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वाच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त केंद्र शासनाकडून मेरी माटी मेरा देश हे अभियान राबविण्यात आलेले आहे. विकसित भारताचे लक्ष साध्य करणे व मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी व रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुति देणाऱ्या शूरवीरांच्या सन्मानार्थ या अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अभियानांतर्गत देशभरातील सर्व गावे व शहरांतील माती अमृत कलशात संकलित करून पुढे दिल्ली येथे यामातीचा वापर करून शूरवीरांच्या सन्मानार्थ अमृत वाटीकेची निर्मिती केली जाणार आहे.
या अभियानांतर्गत मुंबई व दिल्ली येथील कार्यक्रमांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 20 जणांची टीम रवाना झाली आहे. जिल्हाधिकारी श्री किशोर तावडे, मुख्यकार्यकारी अधिकारी श्री प्रजित नायर यांनी श्रीफळ वाढवून सर्व स्वयंसेवक व जिल्हासमन्वयक यांच्या बसला दिल्ली येथील प्रस्थानासाठी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी प्रकल्प संचालक सिंधुदुर्ग श्री उदय पाटील, उपमुख्यकार्यकरी अधिकारी (सामान्य) श्री किशोर काळे , उपमुख्यकार्यकरी अधिकारी (ग्रामपंचायत) विशाल तनपुरे, प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे, बीडीओ श्री अजिंक्य सावंत उपस्थित होते.
दिल्ली येथे मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिनांक 31 ऑक्टोबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्व आठ नगरपालिकांचा मिळून एक अमृत कलश व सर्व आठ तालुक्यांचे आठ अमृत कलश घेऊन स्वयंसेवक व जिल्हा समन्वयक श्री महादेव शिंगाडे रवाना झाले. राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमधून माती एकत्रित केलेले अमृत कलश दिनांक 27 ऑक्टोबर रोजी ऑगस्ट क्रांती मैदान, मुंबई येथे मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होतील व तेथून पुढे माननीय पंतप्रधान महोदय यांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या कार्यक्रमासाठी कर्तव्यपथ दिल्ली येथे रवाना होतील. दिल्ली येथे देशभरातून आलेल्या सर्व गावागावातील, शहरांमधील माती एकत्रित करून अमृत वटीकेची निर्मिती केली जाणार आहे.