गोडोली -प्रतिनिधी
शहराच्या हद्दवाढीत नगरपालिका, शासकीय निधीतून विकास कामे करण्यासाठी लोकप्रतिनिधींची चढाओढ सुरू आहे. यात साईबाबा मंदिर ते कल्याणी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील छोट्या ओढ्यावर नगरपालिकांच्या निधीतून दोन आठवड्यापासून पुलाचे काम उभारणी सुरू आहे. ठेकेदाराने दोन दिवसात घाईघाईत स्लॅप टाकण्याचे बुधवार सकाळी काम सुरू केले, दुपारी पुर्ण केले तर ६ वाजता तो स्लॅप पडला. खासदारांनी निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांना मंगळवारी काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला असताना त्यांना बुधवारी हा ठेकेदार सापडला आहे.
रुंदीकरणाच्या नावाखाली साईबाबा मंदिर ते कल्याणी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कर्मवीर कॉलनी लगत असलेल्या ओढ्यावरील पुल पाडण्यात आला. नगरपालिकेकडून या कामासाठी तब्बल ७६ लाखाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून दोन महिन्यापूर्वी वाजत गाजत कामाचा शुभारंभ झाला.
सदरच्या पुलाच्या कामाची दोन आठवडे सुरूवात होऊन ही देखभाल करण्यासाठी नगरपालिकेचे ना अधिकारी ना कर्मचारी फिरकले नाहीत तर ठेकेदाराकडून रात्री उशिरापर्यंत भिंतीसाठी क्रॉंक्रीट अंधारात चाचपडत भरले आहे. गटारातील पाणीचा वापर करत कामे केले जात आहे. सोमवार,मंगळवार स्लॅपच्या सळ्या गुंतवल्या, बुधवारी सकाळी १० नंतर प्रत्यक्षात स्लॅप टाकण्याचे काम २ तास सुरू होते. त्यानंतर सायंकाळी ६ च्या दरम्यान तो स्लॅप पडला.
सदरच्या कामासाठी बड्या कार्यकर्त्यांच्या जवळचा पोसलेला ठेकेदार असून त्यावर आता काय कारवाई केली जाते , याकडे काही सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष घालणार आहेत. काही कार्यकर्त्यांनी पुलाच्या पडलेल्या स्लॅपचे फोटो काढून आता ठेकेदार एवढेंच दोषी असलेल्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
सुरूवातीपासून ठेकेदाराकडून दिवसा कमी आणि अंधार पडला की काम जास्त केले आहे.बांधकामासाठी गटारातील घाण पाण्याचा वापर केला आहे. रेडिमिक्स आणून रात्री भिंती उभारल्या आहेत. काम सुरू झाल्या पासून नगरपालिकेचे मुख्याधिकारी, बांधकाम अभियंता, कर्मचारी एकदा ही फिरकले नाहीत. यात वापरलेले निकृष्ट दर्जाचे सिमेंट,सळई वापरल्याचा आरोप तरुण भारत शी बोलताना स्थानिक नागरिकांनी केला आहे.