कामाची बिले मागण्यासाठी आंदोलन करताना प्रकार
बेळगाव : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालय आवारात एका कंत्राटदाराने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे. या कंत्राटदारावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात आले आहेत. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. नागाप्पा भंगी (वय 47) रा. कुमारस्वामी लेआऊट असे त्या कंत्राटदाराचे नाव आहे. किल्ला येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर त्याने बुधवारी सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यासंबंधी कार्यकारी अभियंते सिद्धाप्पा सोरबद यांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. आपण केलेल्या कामाची बिले मागण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर त्याने धरणे धरले होते. त्यावेळी कार्यकारी अभियंत्यांनी नियमानुसार कामांची पाहणी करून बिले देण्यात येतील, असे सांगितले. त्यावेळी अभियंत्यांच्या समोरच त्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
कंत्राटदाराचा अधिकाऱ्यांवर आरोप
साहाय्यक कार्यकारी अभियंते रमेश हेगडे व बसवराज हलगी हे बिले देण्यासाठी आपल्याला त्रास करीत आहेत, असा आरोपही कंत्राटदाराने केला आहे. सध्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंत्राटदारावर एफआयआर दाखल झाला आहे. जर कंत्राटदाराने अधिकाऱ्यांवर तक्रार केल्यास तोही दाखल करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.









