सुदैवाने जीवितहानी टळली
वार्ताहर /काकती
काकती येथील राष्ट्रीय महामार्गावर ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रकची व कंटेनरची धडक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ट्रक व कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गुरुवारी रात्री 11 वाजता ही घटना घडली असून काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार खानापूर येथील बुटकी खेडेगावातून ऊस भरून ट्रक मार्कंडेय साखर कारखान्याला येत होता. काकती येथील राष्ट्रीय महामार्गावरील रविकिरण हॉटेलजवळ सदर उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला (एमएच 43, 7790) पाठीमागून भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. यामुळे उसाने भरलेला ट्रक दुभाजकावर धडकून चढला. यामुळे भरलेला ऊस खाली कोसळला. या अपघातात ट्रकचे नुकसान झाले असून कंटेनरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून समोरच्या केबीनचा भाग चेंदामेंदा झाला आहे. सुदैवाने वाहनचालकाला देखील दुखापत झाली नाही. दिवसभरात राष्ट्रीय महामार्गावर कोसळलेल्या व ट्रकमधील उसाची दुसऱ्या गाडीत भरून पाठवणी करण्यात आली आहे. या राष्ट्रीय महामार्गावर वाहने भरधाव धावत असल्याने अधुन-मधून अपघात घडत आहेत. अपघाताची माहिती समजताच काकती पोलिसांनी रहदारी नियंत्रणात आणून चोख बंदोबस्त ठेवला असून या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.









