पुणे / वार्ताहर :
व्हॉटस्ॲप ग्रुपवरील चॅटिंगच्या वादातून एका बांधकाम व्यवसायिकाने प्लॉटिंगचा व्यवसाय करणाऱ्या एकावर गोळीबार केल्याची घटना पुण्यातील सिंहगड रोडवरील सनसिटी भागात मंगळवारी दुपारी घडली. या घटनेत रमेश राठोड (रा. वारजे माळवाडी, पुणे) हे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी बांधकाम व्यवसायिक संतोष पवार याला ताब्यात घेतले आहे.
आरोपी संतोष पवार हा बांधकाम व्यवसायिक असून, त्याला पोलीस संरक्षण आहे. तर जखमी रमेश राठोड यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. या दोघांमध्ये व्हॉटस्ॲप चॅटिंगवरुन वादविवाद झालेले होते. मंगळवारी दुपारी सिंहगड रोडवरील सनसिटी भागात योगीराज ऑटो सेंटरमध्ये रमेश राठोड, संतोष पवार व देवा राठोड हे गप्पा मारत थांबलेले होते. त्यावेळी देवा राठोड याने त्याच्याकडील एका व्हॉटस्ॲप ग्रुपवर संतोष पवार यांच्या संर्दभात एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली. त्यावरुन देवा राठोड व संतोष पवार यांच्यात वाद होऊन भांडणास सुरुवात झाली. या दोघांची भांडणे सोडविण्यासाठी रमेश राठोड हे मध्ये पडले असता, संतोष पवार याने त्याच्या कमरेला लावलेले पिस्तुल काढून रमेश राठोडच्या दिशेने तीन राऊंड फायर केले. यात रमेश राठोड यांच्या पायाला गोळी लागून ते खाली कोसळले.
दरम्यान, गोळीबाराची घटना समजताच, सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी संतोष पवारला ताब्यात घेतले. भरदिवसा रहादारीच्या ठिकाणी गोळीबार झाल्याने या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करत आहेत.









