काँग्रेसकडून ध्वनिफीत जारी : भाजप उमेदवार मणिकंठ राठोड यांच्याकडे अंगुलीनिर्देश
प्रतिनिधी/ बेंगळूर
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या कुटुंबीयांना संपविण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूरचे भाजप उमेदवार मणिकंठ राठोड यांनी स्थानिक भाजप कार्यकर्त्याशी संभाषण केल्याची ऑडिओ क्लिप काँग्रेसने प्रसारित केली आहे. सदर ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी संभाषण करताना खर्गे यांच्या कुटुंबाचे नाव घेतल्याचा उल्लेख आहे. सदर ध्वनिफितीतील संभाषण मणिकंठ राठोड आणि रवी यांच्यातीलच असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी यासंबंधी चौकशी करण्यात येईल, असे म्हटले आहे.
बेंगळूरमधील प्रदेश काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेत राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी सदर ध्वनिफित उघड केली आहे. खर्गे कुटुंबाविषयी द्वेष बाळगून भाजपने कारस्थान रचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य दौऱ्यावर असून देखील ते याविषयी वाच्यता करत नाहीत. विधानसभा निवडणुकीत जनता काँग्रेसला पाठिंबा देत असल्याने भाजप नेते हताशपणे दुष्कृत्याचा कट रचण्यापर्यंत पोहोचले आहेत, असा आरोप सुरजेवाला यांनी केला.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कुटुंबीयांच्या हत्येसंबंधी मणिकंठ राठोड यांचा आवाज असणाऱ्या कथित ध्वनिफितीवरून गोंधळ निर्माण झाला आहे. राठोड यांनी आपल्याविरुद्ध बनावट ऑडिओ क्लिप तयार करून कारस्थान रचण्यात आले आहे. पराभवाच्या भीतीमुळे आपल्यावर निराधार आरोप करण्यात आला आहे, असा प्रत्यारोप केला आहे.
ध्वनिफितीचा तपास करणार : बोम्माई
खर्गे यांच्या कुटुंबासंबंधीच्या कथित ध्वनिफितीविषयी गुन्हा दाखल करून तपास करण्यात येईल. ध्वनिफितीची सत्यासत्यता पडताळण्यात येईल. ध्वनिफितीतीत फेरफार करण्यात आला आहे का, याविषयी देखील तपास करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.









