तीन लाख इस्रायली सैनिकांची फौज सज्ज : गाझामध्ये जमिनीवर हल्ला करण्यासाठी कठोर प्रशिक्षण
वृत्तसंस्था/ तेल अवीव
गेल्या 14 दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे सध्या इस्रायल आणि हमासवर संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या आहेत. हे युद्ध 7 ऑक्टोबर रोजी सुरू झाले. आता गाझा येथील हमास या दहशतवादी संघटनेचा खात्मा करण्यासाठी इस्रायलने आपली तयारी पूर्ण केली आहे. आकाशातून बॉम्बचा वर्षाव केल्यानंतर इस्रायली लष्कर आता गाझापट्टीमध्ये जमिनीवर थेट कारवाई करण्याच्या तयारीत आहे. सध्या इस्रायलमध्ये सैनिकांना प्रशिक्षण दिले जात आहे.
इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने युद्धाची व्यापक रणनीती तयार केली आहे. हवाई हल्ले रोखण्याबरोबरच हमासला जशास तसे उत्तर दिले जात आहे. आता भूपृष्ठावरून हल्ला करण्याच्या उद्देशाने हजारो सैनिक प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होत आहेत. ‘आयडीएफ’ने अलिकडच्या काही दिवसात मोठ्या जमिनीवरील हल्ल्यापूर्वी हजारो सैनिकांना गाझा सीमेवर तैनात केले आहे. या सीमेवरून लवकरच जमिनीवरील कारवाई सुरू होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ‘आयडीएफ’ने इस्रायली लोकसंख्येचे रक्षण करण्यासाठी आपली तयारी आणि क्षमता मजबूत करण्यासाठी 3,00,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना पाचारण करून राखीव दलांची जमवाजमव केली आहे. “जेव्हा सरकार निर्णय घेईल, तेव्हा गाझामध्ये जमिनीवर हल्ला केला जाईल. अर्थात, इस्रायली सरकारकडून आलेल्या निर्देशानुसार आपण सज्ज असल्याचा दावा ‘आयडीएफ’ने केला आहे. आमचे लक्ष पूर्णपणे हमास आणि त्याच्या पायाभूत सुविधांना पराभूत करण्यावर आहे. गाझापट्टीतील राहणारे सर्वसामान्य लोक आमचे शत्रू नसून आम्ही ‘हमास’चा नायनाट करण्यासाठी पूर्ण क्षमतेने उतरणार असल्याचे ‘आयडीएफ’चे प्रवक्ते मार्क्स शेफ यांनी सांगितले.
बलाढ्या देशांचे प्रयत्न असफल
जगातील बलाढ्या देशांनी इस्रायल-हमास संघर्ष मिटविण्यासाठी प्रयत्न केले असले तरी त्याला अद्याप यश आलेले नाही. युद्धाच्या सुऊवातीपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यापासून ते ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यापर्यंत सर्वांना इस्रायलला भेट द्यावी लागली. यावेळी त्यांनी युद्धात सहभागी असलेल्या दोन्ही पक्षांशी तसेच युद्धक्षेत्राजवळ उपस्थित असलेल्या अरब देशांच्या प्रमुखांशी चर्चा केली. आताही इजिप्तमध्ये मध्यस्थीसाठी खलबते सुरू असून दोन्ही बाजूंवर युद्धस्थिती संपविण्यासाठी दबाव टाकला जात आहे. मात्र, इस्रायलने हमासविरोधातील संघर्ष तीव्र करण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचे मानवतावादी धोरण
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी गाझाला मानवतावादी मदत देण्याबाबत इस्रायलशी चर्चा केली. सध्या गाझामध्ये मूलभूत गोष्टींचा तुटवडा आहे. इस्रायलने पाणी, वीज आणि गॅस यासारख्या गोष्टींवर निर्बंध लादले आहेत. मात्र, संयुक्त राष्ट्राच्या हस्तक्षेपानंतर मानवतावादी दृष्टीने मदत पुरविण्यास सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले. इजिप्तमधील रफाह क्रॉसिंगवरून साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने रवाना होत असल्याचे समजते.
इस्रायल-हमास युद्धाचे प्रादेशिक संघर्षात रुपांतर होण्याची भीती आहे. अलीकडच्या काही दिवसात, इराण-समर्थित दहशतवादी गट हिजबुल्लाहचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर इस्रायल आणि दक्षिण लेबनॉनमध्ये गोळीबार तीव्र झाला आहे. दरम्यान, गाझा ऊग्णालयात बॉम्बस्फोट पॅलेस्टिनी रॉकेटच्या चुकीच्या गोळीबारामुळे झाल्याचा खुलासा फ्रेंच गुप्तचर संस्थेने केला आहे.
आतापर्यंतच्या युद्धात दोन्ही पक्षांचे खूप नुकसान झाले आहे. मात्र, या काळात गाझा पट्टीत राहणाऱ्या पॅलेस्टिनींना खूप त्रास सहन करावा लागत आहे. इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये आतापर्यंत 4,385 लोक मारले गेले आहेत, ज्यात 1,756 मुले आणि 967 महिलांचा समावेश आहे. यासोबतच इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 13,561 लोक जखमी झाले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांपैकी 70 टक्के मुले, महिला आणि वृद्ध आहेत.









