मांसाहारावर पूर्ण बंदी, भारतातील गुजरातमध्ये आहे शहर
भारत वैविध्यपूर्ण देश आहे. येथील प्रत्येक राज्याची वेगळी भाषा, आहारसंस्कृती आणि ओळख आहे. येथे एकाहून एक प्राचीन आणि दिव्य धार्मिक स्थळे आहेत. भारतात जगातील पहिली व्हेज सिटी (पूर्णपणे शाकाहारी असणारे शहर) आहे.
पालितानाला मिळाला दर्जा
गुजरातमधील पालिताना शहर जगातील एकमात्र शाकाहारी शहर आहे. 2014 मध्ये गुजरात सरकारने याला संपूर्ण शाकाहारी घोषित केले. येथे जगभरातून जैन धर्म मानणारे अनुयायी मोठय़ा संख्येत पोहोचतात. या शहरात मांसाहारावर पूर्णपणे बंदी आहे.

एक हजाराहून अधिक मंदिरे
पालिताना शहरात जैन मंदिरांची संख्या मोठी आहे. हे शहर गुजरातच्या भावनगर जिल्हय़ात आहे. येथे शत्रुजय पर्वतरांगा असून तेथे सुमारे 900 हून अधिक मंदिरे आहेत. 2014 पासून येथे शेकडो जैन मुनी आणि संतांनी उपोषण करत सरकारला प्राण्यांना मारण्यावर बंदी घालण्यासह कत्तलखाने बंद करण्याची मागणी केली होती. संतांच्या आंदोलनासमोर राज्य सरकारला झुकावे लागले. अनेक ऋषी-मुनींना येथे मोक्ष मिळाला होता असे मानले जाते. अशा स्थितीत दीर्घकाळापासून असलेली जैनमुनींची मागणी मान्य करत येथे कठोर कायदा करण्यात आला. यामुळे पालिताना हे जगातील पहिले शाकाहारी शहर ठरले आहे.
येथे कसे पोहोचणार?
या शहराचे हे वैशिष्टय़ जाणून येथे फिरण्याची इच्छा असल्यास गुजरातच्या भावनगर येथून बस किंवा टॅक्सीमधून प्रवास करावा लागणार आहे. हे ठिकाण शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. याचबरोबर वडोदरा किंवा अहमदाबाद येथून रेल्वे किंवा बसने येथे पोहोचता येते.









