वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
धोंडशिरेच्या दुखापतीनंतर ट्रॅकवर परतलेल्या प्रतिभावान प्रिया हब्बाथनहळ्ळी मोहनने क्युबाचे नवे प्रशिक्षक एनियर गार्सिया यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी आशियाई खेळांत पदक मिळविण्याचे आणि 400 मीटरच्या शर्यतीत पुन्हा एकदा देशातील सर्वांत वेगवान धावपटू बनण्याचे ध्येय ठेवले आहे.
प्रिया 2021 मध्ये 52.77 सेकंदांच्या वेळेसह 400 मीटर्स शर्यतीतील सर्वात वेगवान महिला धावपटू म्हणून उदयास आली होती. तेव्हा ती फक्त 18 वर्षांची होती आणि कनिष्ठ स्तरावर स्पर्धा करत होती. मात्र दोन वर्षांनंतर आणि दोन जागतिक 20 वर्षांखालील स्पर्धांमध्ये वैयक्तिक पदक जिंकण्यात अपयशी ठरल्यानंतर तिने नवीन सुऊवातीची गरज असल्याचे जाणले.
दोन महिन्यांपूर्वी प्रियाने तिचे दीर्घकालीन प्रशिक्षक अर्जुन अजय यांच्यापासून वेगळे होणे पसंत केले. अर्जुन अजय यांनी तिला सर्वप्रथम 2018 मध्ये राष्ट्रीय शालेय मेळाव्यात पाहिले होते. आता 2000 च्या ऑलिम्पिकमधील 110 मीटर हर्डल्स शर्यतीतील विजेते राहिलेल्या क्युबाच्या एनियर गार्सिया यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटकातील बेल्लारी येथील इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टमध्ये ती प्रशिक्षण घेत आहे. .
या चार वर्षांत माझ्या जीवनात अनेक चढ-उतार आले. एकदा वर गेल्यावर खाली यावे लागते. ती घसरण खेळाडूच्या जीवनात महत्त्वाची असते. कारण ती तुम्हाला मजबूत पुनरागमन करण्यासाठी आवश्यक असलेले धडे शिकवते, असे प्रियाने म्हटले आहे. मी नवीन प्रशिक्षकासह सुऊवात केली आहे. मला वाटते की, ही एक नवीन सुऊवात आहे. आम्हाला अजून बरीच लक्ष्ये गाठायची आहेत. मी यंदा 400 मीटर्स शर्यतीतील सर्वांत वेगवान धावपटू बनण्याचा आणि आशियाई खेळांमध्ये पदक जिंकण्याचा प्रयत्न करेन, असे ती म्हणाली.









