देवदर्शन केल्यानंतर देवासमोर नारळ फोडणे, (फोडणे हा शब्द योग्य वाटत नसल्याने नारळ वाढविणे असेही म्हणतात) हा हिंदू धर्मातील पूजाआर्चेचा एक भाग आहे. राजस्थानातील सिरोही जिल्ह्यात कुई सांगणा या ग्रामी भगवान शंकराचे एक प्राचीन मंदीर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्या असे की येथे भगवान शंकराच्या मूर्तीसमोर नारळ ठेवला की तो अपोआप तडकतो किंवा फुटतो. या तीर्थस्थळाला भेट दिलेले असंख्य भाविक असा अनुभव आल्याचे स्पष्ट करतात.
असे घडते हे अनेकांना मान्यही होत नाही. ही लोकांची अंधश्रद्धा आहे, असेही अनेक लोक मानतात. नारळ आपोआप फुटतो असे मानणे अवैज्ञानिक आहे, असेही अनेकांचे मत आहे. तेव्हा देवासमोर ठेवलेला नारळ अपोआप फुटणे हे सत्य आहे की केवळ लोकांचा विश्वास आहे, यावर पूर्वीपासून बरीच चर्चा झालेली आहे. पण या रहस्याचा भेद मात्र अद्याप झालेला नाही. मात्र, यामुळे येथे भाविकांची गर्दी मात्र प्रचंड प्रमाणात होते. भगवान शंकरांसमोर ठेवलेला नारळ अपोआप फुटतो का, हे पाहण्यासाठीही अनेकजण येथे उत्सुकतेपोटी येत असतात.
हे शिवमंदीर एक हजार वर्षांपेक्षाही अधिक जुने आहे. मंदिराच्या समोर चवदार पाण्याचा जिवंत झरा आहे, जो सदैव वहात असतो. येथे एक कुंडही असून त्याचे पाणी कधीही आटत नाही, असा भाविकांचा अनुभव आहे. या मंदिरात विशिष्ट स्थानी ठेवलेला नारळ अपोआप फुटतो, असा विश्वास तरी निश्चितच आहे. त्यामुळे या भगवान महादेवांना ‘चटक महादेव’ अशी संज्ञा भक्तांनी दिली आहे. हिंदी भाषेत ‘चटकना’ हा शब्द असून त्याचा अर्थ तडकणे किंवा फुटणे असा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठ्या जत्रेचे आयोजन केले जाते. या जत्रेत भाग घेण्यासाठी लक्षावधी भाविक भारताच्या सर्व भागांमधून येत असतात.









