कोल्हापूर / राजेंद्र होळकर :
शहरातील संभाजीनगर एसटी डेपोच्या एसटी बसमध्ये झुरळं फिरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो व्हिडीओ संबंधित एसटी बसच्या वाहकानेच दिल्याचा ठपका ठेवत, राज्य परिवहन महामंडळाने संतोष रघुनाथ शिंदे (वाहक क्रमांक 45950) या वाहकावर निलंबनची कारवाई केली. या कारवाईने झुरळानी घालवली एसटी वाहकाची नोकरी असे म्हणायची वेळ शिंदे यांच्यावर आली आहे.
संतोष शिंदे हे राज्य परिवहन महामंडळाच्या संभाजीनगर आगारात वाहक म्हणून नोकरी करीत आहेत. 5 मार्च रोजी ते संभाजीनगर ते पुणे स्टेशन या मार्गावर धावणाऱ्या एसटी क्रमांक एमएच 14 बीटी 3788 या बसमध्ये वाहक म्हणून कर्तव्य पार पाडीत होते. याच एसटी बसमधून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांच्या अंगावर प्रवाशादरम्यान झुरळं फिरु लागली. झुरळं एसटीच्या प्रवाशाच्या अंगावर फिरत असल्याचा व्हिडीओ कोणीतरी मोबाईलमध्ये चित्रीत करुन व्हायरल केला. या व्हायरल व्हिडीओची प्रसार माध्यमांनी दखल घेऊन, याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले. या वृत्ताची राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली.
त्यांनी राज्य परिवहन महामंडळाची प्रतिमा जनमाणसांत मलिन करण्याचा हा व्हिडीओ कोणी व्हायरल केला. याची कसून चौकशी सुरु केली. चौकशीअंती हा व्हिडीओ संबंधीत एसटीचा वाहक संतोष शिंदे यांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करुन, तो प्रसार माध्यमांना पुरविल्याचा त्याच्यावर ठपका ठेवून, त्याला गुरुवारी दुपारी राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेतून निलंबित करण्यात आले.
- आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयात हजेरी
एसटी वाहक संतोष शिंदे यांना एसटीच्या सेवेतून निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांची संभाजीनगर एसटी आगाराच्या व्यवस्थापकांच्या कार्यालयात जाऊन, आठवड्याची साप्ताहिक सुट्टी वगळून, दररोज सकाळी नऊ व सांयकाळी 5 वाजता हजेरी लावली आहे. तसेच त्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्यात आली आहे, असेही निलंबित करण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.
- झुरळाचा बंदोबस्ताऐवजी वाहकावर कारवाई
राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी एसटीमधून प्रवास करीत असलेल्या प्रवाशाच्या अंगावऊन फिरणाऱ्या झुरळाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यांनतर एसटीमधील झुरळाचा बंदोबस्त करण्याऐवजी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधीत एसटीचा वाहक संतोष शिंदेवर निलंबितची कारवाई कऊन, अजब कारभार समोर आणल्याबाबत, एसटीच्या वाहक व चालकांच्यात चर्चा केली जात आहे.








