प्रवास.. मग तो रेल्वेच्या वातानुकूलित श्रेणीचा असो किंवा साध्या शयन कक्षातला, बसचा असो अथवा विमानाचा, शेजारी प्रवासी कसे भेटतात यावर प्रवासाचे सौख्य अवलंबून असते. शेजारी बसलेले प्रवासी जर मोठ्याने अति बडबड करणारे, एकसारखे खाणारे-पिणारे, घोरणारे किंवा विनाकारण चौकशी करणारे असतील तर एकतर भांडणे होतात नाहीतर सहनशक्तीची परिसीमा होते. नशिबात जर उत्तम सहप्रवासी भेटले तर चांगले आदानप्रदान होऊन सत्संग घडतो. जन्माला आल्यापासून गन्तव्य मुक्कामास पोहोचेपर्यंत आयुष्याच्या प्रवासात अनेक शेजारी भेटतात. त्यांचा आयुष्यावर खोलवर गहन परिणाम होतो. जीवन घडणे- बिघडणे बरेचदा शेजाऱ्यांवरही अवलंबून असते. परंतु हे मागाहून लक्षात येते.
एक मात्र खरे की ज्यांचे आपल्या शेजाऱ्यांशी वैचारिक, सामाजिक आणि हळवे अनुबंध असतात त्यांचा स्वभाव चांगला असतो असे समजायला हरकत नाही. शेजारी हा आधार असतो किंवा प्रचंड डोकेदुखी असते. कविश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर यांच्या चरित्रातली एक गोष्ट आहे. रवींद्रनाथांना जेव्हा नोबेल पुरस्कार मिळाला तेव्हा जगभरातले लोक त्यांचे अभिनंदन करायला आले. माणसांची मोठी रांग लागली; परंतु त्यांच्या शेजारी राहणाऱ्या माणसाने त्यांचे अभिनंदन केले नाही. लोक रवींद्रनाथांच्या पाया पडत होते, मोठा आनंद उत्सव चालला होता.
हे दृश्य बघून त्यांच्या शेजाऱ्याच्या मनात असूया निर्माण झाली. टागोरांना वाटले, आपल्यावर अभिनंदनाचा एवढा वर्षाव झाला; मात्र सख्ख्या शेजाऱ्याने पाठ फिरवली. तो काही साधा नमस्कार करायला आला नाही. एवढा मोठा पुरस्कार मिळूनही टागोरांचे मन यामुळे अस्वस्थ झाले. एक दिवस सकाळी ते समुद्रकिनारी फिरायला गेले असता त्यांना निसर्गाने दिलेल्या दर्शनामुळे त्यांची वृत्ती अंतर्बाह्य बदलून गेली. त्यांनी बघितले की सूर्य भगवानाने आपली सोनेरी किरणे अथांग समुद्रावर पसरवून तो सोन्याचा करून टाकला होता. अचानक त्यांचे लक्ष शेजारी असलेल्या खड्ड्याकडे गेले. तेथेही सूर्याने आपली सोनेरी किरणे आच्छादलेली होती. रवींद्रनाथांना वाटले की साक्षात सूर्यभगवान जर एवढी समानता ठेवतात तर आपण का भेद करायचा? आपल्या मनाला पाया पडायचा प्रश्न छळतोय ना? तर आता आपणच जाऊन शेजाऱ्यांना नमस्कार करूया. परतताना टागोर सरळ शेजारी गेले. बाहेरच्या अंगणात शेजारी ऊन खात चहा पीत बसले होते. टागोर तिथे गेले आणि एकदम त्यांच्या पाया पडले. शेजारी आश्चर्याने उठून उभा राहिला, खजील झाला. रवींद्रनाथांसारखा नोबेल पुरस्कार विजेता घरी येऊन पाया पडतो म्हणजे काय? त्यांच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहू लागले. त्यांच्या मनाने टागोरांचे मोठेपण तात्काळ मान्य केले. त्यांचे अभिनंदन केले.
संत नामदेव महाराजांनी भक्तीगर्व परिहार या उपशीर्षकाअंतर्गत सुमारे 30 अभंगांमध्ये श्री नामदेव व श्री ज्ञानदेव संतांची भेट असे सविस्तर वर्णन केले आहे. संत नामदेव महाराज जेव्हा आळंदीमध्ये सिद्ध बेटातील निवृत्तीनाथांच्या कुटीत आले तेव्हा हर्षभराने ‘पंढरीचा प्रेमा घरी आला’ म्हणून त्यांचे त्यांनी स्वागत केले. देवाला घालतात तशी प्रदक्षिणा घालून ते त्यांच्या पाया पडले. नामदेवांना वाटले, ‘देवाचे जवळी आम्ही निरंतर, याचि अधिकारा नमस्कार’. माझ्यापाशी विठ्ठल परब्रह्म स्वत: उपस्थित असताना मग मी कशाला प्रतिनमस्कार करू? म्हणून मग नमस्कार केला नाही. नंतर ज्ञानोबा माऊली जागेवरून उठले आणि त्यांनी संत नामदेवांच्या चरणी मस्तक ठेवले. संत नामदेव म्हणाले, ‘आम्ही देवापाशी असतो सर्वकाळ, येऊनी सकळ वंदिताती’. शिवाय मी वयाने वडील असल्यामुळे माऊलींनी केलेला नमस्कार योग्यच आहे. नंतर सोपानदेव उठले. नामदेवांना पाहून त्यांना मायबाप भेटल्याचा आनंद झाला. ते सुद्धा पाया पडले. हे सगळे दृश्य आदिशक्ती मुक्ताबाई बघत होती. आपले ज्येष्ठश्रेष्ठ तीन भाऊ नमस्कार करीत आहेत आणि नामदेव त्यांना अभिमानामुळे प्रतिनमस्कारही करत नाहीत हे बघून ती म्हणाली, ‘अखंड जयाला देवाचा शेजार, का रे अहंकार गेला नाही?’ तिने नामदेवांची कानउघाडणी केली. प्रत्यक्ष नित्य विठ्ठलाच्या शेजारी असून हा अंतरीचा कोरा राहिला. संतांचा सन्मान कसा करावा हे अभिमानामुळे याला समजले नाही.
संत निवृत्तीनाथांनी मुक्ताईला समजावले की नामदेवाने आपल्या प्रेमामुळे पांडुरंगाला वेडे केले आहे. आपले भाग्य थोर म्हणून ते आपल्या घरी आले. यावर मुक्ताबाई काय म्हणाली? ‘म्हणे मुक्ताबाई घाला लोटांगण, आपणा आदर्श न लगे त्याचे’. यातून संत नामदेवांच्या उद्धाराची कळकळ दिसते. हे सर्व नामदेवांनीच लिहून ठेवलेले आहे. विठ्ठलाचा शेजार असून नामदेव आत्मनिष्ठ नाही याचे मुक्ताईला वाईट वाटले. ही सर्व संत नामदेवांची लीलाच आहे.
पूर्वी मराठी माध्यम प्राथमिक शाळेत शेजीबाई नावाची एक कविता होती. ‘शेजीबाईचा कोंबडा, आला माझ्या दारी, घालीन दाणे, पाजीन पाणी..’ याप्रमाणे शेजाऱ्यांची गाय, शेळी जर दारी आली तर त्यांना चारा, पाला घालून पाणी पाजायचं हा बालमनावर रुजणारा एक संस्कार आहे. माणसाच्या जगण्याचा मध्यवर्ती घटक म्हणजे शेजारी असतात. क्षुल्लक कारणांवरून शेजाऱ्यांशी नित्य भांडणे ही ठरलेली असतात. झाडांचा कचरा, फुले, फळे अंगणात पडणे, भिंत एक असणे ही स्वतंत्र घरे असणाऱ्यांची व्यथा असते, तर सदनिकांमध्ये पाळीव प्राणी, लहान मुले आणि क्वचित दाराबाहेरची रांगोळी, वस्तू यावरून भांडणे होतात. पूर्वी घराचे फाटक जरा कुठे चुकून उघडे राहिले तर पाळीव प्राणी आत शिरून मेहनतीने फुलवलेल्या बागेची नासधूस करत. शेजाऱ्यांचा सगळा राग प्राण्यांवर निघायचा. भांडणे विकोपाला जाऊन शेजाऱ्यांशी कायमचा अबोला हा ठरलेला असायचा. म्हणून शेजाऱ्यांचे पाळीव प्राणी आपल्या घरात, अंगणात आले तर त्यांना प्रेमाने खाऊ घालून पाणी पाजावे, त्यांना मारू नये हा संस्कारांचा ठसा बालमनावर रुजवण्याचे कार्य ही कविता करते.
काळ बदलला, माणसांची मने बदलली, पैसा मिळवणे हे जीवितकार्य होऊन बसले आणि शेजार दुरावला. दलाई लामा म्हणतात, ‘आपण भले चंद्रावर गेलोआलो, पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणं काही होत नाही’. महानगरांमध्ये अति व्यस्ततेमुळे शेजारी कोण राहते आहे याचा पत्ता नसतो. ज्यांना जगण्याचे मूल्य कळते त्यांनाच माणसांचे महत्त्व कळते आणि ते घरीदारी, कार्यालयात, रांगेत शेजाऱ्यांशी दोन शब्द बोलतात. हेही नसे थोडके. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे.
हाचि नेम आता, न फिरे माघारी, बैसले शेजारी, गोविंदाचे.. ही एक विरहिणी आहे. स्त्राrरूपाचा हा अभंग आहे. महाराज म्हणतात, मी गोविंदाच्या शेजारी बसले आहे. त्यात आता बदल होणार नाही. त्या सावळ्या परब्रह्माशी लग्न लावून मी बळेबळेच त्याची पट्टराणी झाले आहे. आता भय, चिंता नाही. लौकिक शेजाऱ्यांपेक्षा हा अलौकिक शेजार सरळ मोक्षवाट दाखवणारा आहे.
-स्नेहा शिनखेडे








