उत्तर उपनोंदणी कार्यालयातील प्रकार : अधिकाऱ्यांकडून मात्र सारवासारव
बेळगाव : उत्तर उपनोंदणी कार्यालयातील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. उपनोंदणी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत एका लिपिकाचा मुलगा चक्क उपनिबंधकांच्या खुर्चीवर बसून कामकाज करत असतानाचे उघडकीस आले आहे. त्याच्याकडून लॉगिनचा गैरवापर झाल्याचा संशय असून याबाबत उत्तर उपनोंदणी अधिकारी करीबसनगौडा पी. यांनी मात्र प्रसारमाध्यमांशी स्पष्टीकरण देताना सारवासारव केली आहे. मंगळवारी उत्तर उपनोंदणी कार्यालयात अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत एक भलताचजण त्यांच्या खुर्चीवर बसला आहे, अशी माहिती काहींना समजली. त्यामुळे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीदेखील कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी उपनोंदणी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून कार्यालयातील एका लिपिकाचा मुलगा लॉगिन वापरत काम करत असल्याचे दिसून आले.
तितक्यात उपनोंदणी अधिकारी करीबसनगौडा पी. अचानक कार्यालयात दाखल झाले. याबाबत त्यांना प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी विचारले असता ते म्हणाले, सदर तरुणाचे वडील कार्यालयात लिपीक असून ते वयोवृद्ध झाले आहेत. त्यांच्या मदतीला सदर तरुण येतो मात्र तो आपल्या खुर्चीवर बसून काम करत आहे. याची कल्पना आपल्याला नाही, असे उत्तर देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. याबाबत जिल्हा नोंदणी अधिकारी महांतेश पटात यांनी या प्रकाराची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे यावेळी सांगितले. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उपनोंदणी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. लॉगिन उपनोंदणी अधिकारी आपल्या खालील अधिकाऱ्यांना किंवा एफडीएला देऊ शकतात. मात्र बाहेरील व्यक्तीला लॉगिन देता येत नाही. लॉगिनचा गैरवापर झाल्याची लेखी तक्रार दिल्यास याबाबत चौकशी करून कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.









