पक्ष सोडणाऱ्या नेत्यांची अवस्था पहा : पक्षातून हकालपट्टी करणार नाही
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थान काँग्रेसमधील कलह थांबण्याची चिन्हे नाहीत. सचिन पायलट गटाचा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत सुरु असलेला कलह दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. याचदरम्यान शनिवारी काँग्रेसचे राज्य प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा यांनी पायलट गटाला स्पष्ट संदेश भूतकाळाची आठवण करून दिली आहे. भूतकाळात पक्ष सोडणाऱ्या नेत्यांची काय अवस्था झाली हे विसरू नये. काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांची स्थिती सर्व जण ओळखून असल्याचे रंधावा यांनी जयपूर येथे बोलताना म्हटले आहे.
काँग्रेस पक्ष कुणाचीच हकालपट्टी करत नाही. विशेषकरून जुन्या नेत्यांना पक्षातून काढून टाकत नाही. परंतु काँग्रेस पक्ष सोडणारे नेते आता कुठे आहेत हे सर्वांना माहित आहे. सचिन पायलट आतापर्यंत पक्षाने आपले म्हणणे ऐकले नाही अशी तक्रार करायचे. आता पायलट हे पक्षाच्या व्यासपीठावर म्हणणे मांडत आहेत. सचिन पायलट यांनी यात्रा करणे गैर नाही, परंतु त्यांचे टायमिंग चुकीचे आहे. कर्नाटक निवडणुकीवेळी त्यांनी यात्रा करणे टाळायला हवे होते असे म्हणत रंधावा यांनी त्यांना लक्ष्य केले आहे.
काँग्रेस पक्ष कधीच कुणाला काढून टाकत नाही. प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आमच्या पक्षाकडून केला जातो. दीर्घकाळापर्यंत साथ देणाऱ्यांकडे पक्ष दुर्लक्ष करत नसल्याचे रंधावा म्हणाले. सचिन पायलट यांनी अलिकडेच जयपूरमध्ये स्वत:च्या 5 दिवसीय जनसंघर्ष यात्रेचा समारोप केला होता. यावेळी पायलट यांनी राजस्थान लोकसेवा आयोग भंग करत त्याची पुनर्रचना, शासकीय परीक्षेच्या पेपर लीकमुळे प्रभावित प्रत्येक तरुण-तरुणीला भरपाई देणे, परीक्षा आयोजित करविण्यासमवेत तीन मागण्या सरकारसमोर मांडल्या होत्या. तसेच वसुंधरा राजे यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी पायलट यांनी केली होती.
मे महिन्याच्या अखेरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरू करण्याचा इशारा पायलट यांनी स्वत:च्याच पक्षाच्या सरकारला दिला आहे. पायलट यांची यात्रा वैयक्तिक स्वरुपाची होती. काँग्रेस पक्षाचे याच्याशी कुठलेच देणेघेणे नव्हते, असे रंधावा यांनी म्हटले आहे.









