व्हिसा कालावधी समाप्त झाल्यावरही वास्तव्य
वृत्तसंस्था/ कोट्टायम
वैध दस्तऐवजांशिवाय भारतात वास्तव्य करत असलेल्या अफगाणिस्तानच्या एका नागरिकाला केरळच्या कोट्टायम जिल्हय़ातील चंगनास्सेरी भागातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी यासंबंधी माहिती दिली आहे. वैद्यकीय व्हिसावर भारतात आलेला अहमद नजीर उस्मानी (24 वर्षे) हा व्हिसा कालावधी समाप्त झाल्यावरही भारतात राहत होता. चंगनास्सेरी पोलिसांनी उस्मानीला लईक्कड गावातून अटक केली आहे, तेथे तो एका हॉटेलमध्ये काम करत होता.
उस्मानीने यापूर्वी नवी दिल्ली तसेच बेंगळूर येथील हॉटेल्समध्येही काम केले होते. उस्मानीच्या विरोधात अवैध वास्तव्य आणि व्हिसा उल्लंघनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. तर वैध दस्तऐवजांशिवाय उस्मानीला कामावर ठेवल्याप्रकरणी हॉटेल मालकावरही पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.









