गुजरातमध्ये लष्कर-एनडीआरएफचे 19 तास बचावकार्य
वृत्तसंस्था/ जामनगर
गुजरातमधील जामनगरमध्ये बोअरवेलमध्ये पडलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकलीचा अखेर मृत्यू झाला. 200 फूट खोल बोअरवेलमध्ये जवळपास 20 ते 25 फुटांवर अडकलेल्या मुलीला बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाने 19 तास प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र, तिचे प्राण वाचवता आले नाहीत. मृत मुलगी मूळची मध्यप्रदेशातील शेतमजूर असलेल्या आदिवासी कुटुंबातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुजरातमधील जामनगर जिह्यातील तमाचन गावात शनिवारी सकाळी अडीच वर्षांची मुलगी 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडली होती. तिला वाचविण्यासाठी लष्करासह अन्य यंत्रणांकडून अथक परिश्रम घेतले जात होते. तमाचन गावातील एका शेतात काही मजूर कुटुंबे कामाला होती. त्यांची मुले शेतमळ्यात खेळत असताना एक अडीच वर्षांची मुलगी उघड्या बोअरवेलमध्ये पडली. इतर मुलांनी याची माहिती कामगारांना दिल्यानंतर गावच्या सरपंचांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तिच्या सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. लष्कराच्या बचाव पथकाव्यतिरिक्त जामनगरमधील एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि पोलिसांची टीमही घटनास्थळी उपस्थित झाली होती. रविवारी पहाटे 5.45 वाजता जवानांनी मुलीला बाहेर काढले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. प्रशासनासह अग्निशमन दलाच्या जवानांनी शनिवारी सकाळी 11 वाजता बचावकार्य सुरू केले होते. त्यानंतर वडोदरा येथील लष्कर आणि एनडीआरएफही या मोहिमेत सामील झाले. रात्रभर बचावकार्य करण्यात आले. बोअरवेल पाण्याने भरलेले असल्याने मुलीचे प्राण वाचवता न आल्याचे स्पष्टीकरण बचाव पथकाकडून देण्यात आले.