मदिना कॉलनी मधील घटना; हळहळ व संताप; पालिका प्रशासनाविरुध्द तक्रार करणार विक्रम पाटील यांची कारवाईची मागणी
इस्लामपूर प्रतिनिधी
येथील मदिना कॉलनी मधील हसन हर्षद डंगरे (4) या बालकाचा भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात हळहळ व संताप व्यक्त होत आहे. नगर पालिका प्रशासनाचे शहरातील आरोग्य व स्वच्छतेकडे लक्ष नसल्याने भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या वाढल्या आहेत. त्यामुळेच या बालकाचा बळी गेला असून पालिका प्रशासनाच्या विरोधात राज्य शासन व जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार करणार असून याप्रकरणी संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक विक्रम पाटील यांनी केली आहे.
हसन हा वडिलांबरोबर मदिना कॉलनीमध्ये मामांच्या घरी गेला होता. त्याला तेथील भटक्या कुत्र्यांनी डोळ्याला चावा घेतला. त्याला गंभीर अवस्थेत उपजिल्हा रूग्णालय इस्लामपूर येथे नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये रॅबिजचे इंजिक्शन दिले. त्यानंतर दि.11 रोजी व दि. 15 रोजी पुन्हा इंजेक्शन देण्यात आली. त्या बाळाला पुन्हा ताप आल्यानंतर कराड येथील खासगी बालरुग्णालयात उपचार घेतले.
या हॉस्पिटल व्यवस्थापनाने पुन्हा सिव्हील हॉस्पिटलला तातडीने घेवून जाण्यास सांगितले. त्याला नातेवाईकांनी तातडीने सांगली सिव्हील हॉस्पिटलला हलवले. उपचारा दरम्यान कुत्रे चावलेल्या ठिकाणापासून मेंदूपर्यंत इन्फेक्शन झाल्याचे निदान झाले. नातेवाईकांनी हसन याला ससून रूग्णालय पुणे येथे उपचारासाठी हलवले. मात्र त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी चाँद तारा मोहल्ला येथे मुस्तफा शहाबुद्दीन जहागीरदार या 5 वर्षांच्या बालकाच्या मांडीला भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला होता. भटक्या कुत्र्यांच्यामुळे आणखी किती बळी जाण्याची वाट नगरपालिका प्रशासन पाहत आहे. शहरातील नागरिकांनी वारंवार नगर पालिकेकडे भटक्या कुत्र्यांचा व डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी केली होती. मात्र, पालिका प्रशासनाला जाग आली नाही, असा आरोप पाटील यांनी केला आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, नगर पालिकेतील काही खाते प्रमुख असून अडचण, नसून खोळंबा, अशी अवस्था आहे. नागरिक तक्रारीसाठी फोन करतात. पण, अधिकारी स्वीच ऑफ असतात. काहीवेळा फोन सुरु असून ही उचलला जात नाही. काही खाते प्रमुखांची मुदत संपलेली आहे. त्यांनी येथून बदली करुन जावे. अन्यथा तातडीने रजेवर जावे. खाते प्रमुखांच्या चुकीच्या कारभारामुळे विकासावर विपरीत परिणाम झाला आहे. यातील काही खाते प्रमुख भ्रष्ट मार्गाचा अवलंब करत आहेत. नगर पालिकेकडे कोटय़वधींचा निधी असून ही कामात टाळा-टाळ केली जाते. या अधिकाऱयावर कारवाई व्हावी.








