रत्नागिरी :
शहरातील मुख्य रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणाची कामे अनेक भागात केली गेलीत, उन्हाळा गेला. पण काम झालेल्या अनेक भागातील कॉक्रिटीकरणाच्या साईडपट्ट्यांची कामे रेंगाळत ठेवली होती. आता सुरू असलेल्या मुसळधार पावसात त्या अपूर्ण साईडपट्ट्या बाळू मिक्स खडीने बुजविण्यासाठी न. प. प्रशासनाला अचानक जाग आलीय. मंगळवारी तर धुवाँधार पावसाने त्या केलेल्या कामाचा फज्जा उडाला. मुलामा दिलेल्या त्या साईडपट्ट्यांची पुन्हा धुप झाल्याने ते उखडल्याचे चित्र आहे.
रत्नागिरी शहराचे सुशोभिकरण व विकासाच्या दृष्टीने नगरोत्थान योजनेतून सुमारे १०० कोटी रुपये खर्चुन मुख्य रस्त्याच्या कॉक्रिटीकरणाचे काम केले जातेय. पण ज्या भागातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण केलेय, त्या रस्त्याच्या अनेक ठिकाणी बाजूपट्ट्या अद्यापही वर्ष झाले तरीही जशास तशा आहेत. त्यामुळे रस्ता झाला छोटा व पार्किंग, वाहतुकीचाही होतोय खोळंबा अशी स्थिती उभी आहे. शहरातील मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणऐवजी टिकावू कॉक्रिटचे रस्ते बांधण्याचा घेण्यात आलेला निर्णय चांगलाच आहे. मात्र दीड वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही शहरातील कॉक्रिटीकरणाचे हे काम इतके महिने अजूनही अपूर्ण का ठेवण्यात आले, या बाबत शहरवासियांना प्रश्न पडला आहे. रत्नागिरीच्या साळवी स्टॉप येथील प्रवेशद्वारापासून १७ डिसेंबर २०२३ ला कॉंक्रिटीकरणाला सुरुवात झाली. एका बाजूने मारुती मंदिरपर्यंतचा रस्ता काँक्रिटचा झाला. त्यानंतर नाचणे येथून येणाऱ्या मुख्य रस्त्याचे सुरू केले गेले. तर मारुती मंदिरकडून मजगांव मार्गाचे चर्मालय नाक्यापर्यंत काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले. अजूनही बसस्थानकाकडून माळनाक्यापर्यंत येणाऱ्या एका बाजूचे कॉक्रिटीकरणाचे काम शिल्लक राहिले आहे. पण ज्या भागातील कॉंक्रिटीकरण करण्यात आले, त्या रस्त्याच्या मारुती मंदिर सर्कल ते बसस्थानकापर्यंत खाली जाणाऱ्या कॉंक्रिटीकरण झालेल्या रस्त्यांच्या बाजूपट्टी अद्यापही जशास तशीच ठेवण्यात आली होती. मारुती मंदिर सर्कल, माळनाका, शासकीय विश्रामगृह, जयस्तंभ ते अगदी बसस्थानकापर्यंत वाहनचालक, पादचारी, नागरिकांना या खडी टाकलेल्या बाजूपट्टीवरून अडखळत प्रवास करावा लागत होता. माळनाक्यापासून खाली जेलनाका, नगर परिषद, जयस्तंभ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अशीच अवस्था होती.








