डॉ. नीता देशपांडे : कलाविष्कार संस्थेतर्फे आयोजित प्रदर्शन उत्साहात
बेळगाव : सकस आहार, योग्य व्यायाम, पुरेशी झोप आणि ताण न घेणे या सवयींमुळे आपले आरोग्य स्वास्थ्यपूर्ण राहील. केवळ चालणे म्हणजे व्यायाम नव्हे, तर शरीराची पुरेशी हालचाल होणे आवश्यक आहे, असे मत डॉ. नीता देशपांडे यांनी व्यक्त केले. कलाविष्कार संस्थेतर्फे रामनाथ मंगल कार्यालयमध्ये घरगुती उत्पादन करणाऱ्या महिलांना तसेच काही व्यावसायिकांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या हेतूने प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन केल्यानंतर डॉ. नीता देशपांडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी एंजेल फौंडेशनच्या प्रमुख मीना बेनके होत्या. डॉ. देशपांडे म्हणाल्या, आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक रोग निष्कारण सुरू होतात. पण त्यांना वेळीच रोखण्यासाठी बैठ्या जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. आपली उंची आणि आपले वजन यामध्ये समन्वय असायला हवा. लठ्ठपणा आणि कर्करोगाचा संबंध आहे, हे लक्षात घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. मीना बेनके यांनी महिलांनी आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी कुटुंबाबरोबरच स्वत:साठीसुद्धा वेळ द्यावा. आपले आरोग्य निरोगी असेल तर कुटुंबाचे आरोग्यही आपल्याला जपता येते, असे सांगितले. या दिनानिमित्त आयोजित कलाविष्कार प्रदर्शनाच्या निमित्ताने अनेक महिलांची प्रसूती सुलभ करण्यासाठी साहाय्य करणाऱ्या पार्वती बडीगेर यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी सविता क्षीरसागर यांनी स्वागत केले व मीना बेनके यांचा परिचय करून दिला. ममता सिंगबाळ यांनी डॉ. नीता देशपांडे यांचा परिचय करून दिला. प्रारंभी शशीप्रिया हिने गणेश वंदना सादर केली. सूत्रसंचालन तन्वी यांनी केले.









