
वृत्तसंस्था/ बेंगळूर
फलंदाजी व गोलंदाजीत अपेक्षित कामगिरी न होऊ शकलेल्या इंग्लंडला सामना आज गुऊवारी येथे स्पर्धेतील दुसरा संघर्ष करणारा संघ असलेल्या श्रीलंकेशी होणार आहे. यावेळी संघाची गाडी रुळावर आणण्याची कदाचित इंग्लंडसाठी ही अंतिम संधी असेल. या गतविजेत्याचे श्रीलंकेइतकेच चार सामन्यांतून दोन गुण झाले आहेत आणि ते गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहेत.
आज एक विजय मिळाल्यास तो इंग्लंडला गुणतालिकेत खूप पुढे ढकलणार नसला, तरी पुढे भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघांचा सामना करताना त्यांचा आत्मविश्वास उंचावून जाऊ शकेल. पण लंकेविऊद्ध पराभव झाल्यास त्यांची अंतिम संधीही गायब होईल. स्पर्धेतील आव्हान लवकर संपुष्टात येण्याच्या जवळ पोहोचणे टाळण्यासाठी इंग्लंडने आणि खास करून त्यांच्या फलंदाजांनी सुधारित कामगिरी करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना एम. चिन्नास्वामी स्टेडियमपेक्षा अधिक अनुकूल स्थान मिळणार नाही. येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील मागील सामन्यात एकूण 672 धावा काढल्या गेल्या.
इंगलंडने बांगलादेशविऊद्ध धर्मशाला येथे 9 बाद 364 धावा केल्या होत्या. इंग्लंडचे फलंदाज त्या प्रयत्नांची पुनरावृत्ती करण्याची इच्छा आज बाळगून असतील. या स्पर्धेदरम्यान डेव्हिड मलान आणि काही प्रमाणात ज्यो रूट वगळता एकही फलंदाज आपल्या क्षमतेनुरुप कामगिरी करू शकलेला नाही. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेकडून स्वीकारावे लागलेले पराभव त्यांना दु:स्वप्नाप्रमाणे सतावत आहेत. कर्णधार जॉस बटलर, हॅरी ब्रूक, सॅम करन, मोईन अली, ख्रिस वोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु त्यापैकी कोणीही त्यांना जागू शकलेले नाही.
गोलंदाजीत रीस टोपले या स्पर्धेत आठ बळी घेऊन इंग्लंडचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला होता, परंतु तर्जनी फ्रॅक्चर झाल्याने तो उर्वरित विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्यामुळे लेगस्पिनर आदिल रशिद हा त्यांचा सर्वांत जास्त भरवशाचा गोलंदाज बनला असून त्याने आतापर्यंत सहा बळी घेतलेले आहे. तथापि, मागील सामन्यात नेदरलँड्सवर पाच गडी राखून विजय मिळवूनही श्रीलंकेची स्थिती काही चांगली नसल्याने इंग्लंडला दिलासा मिळेल. चार सामन्यांनंतर त्यांनी कर्णधार दासून शनाका आणि युवा वेगवान गोलंदाज मथीशा पाथिराना.या दोन खेळाडूंना दुखापतींमुळे गमावले आहे.
श्रीलंकेकडे दुशमंथा चमीरासारखा वेगवान गोलंदाज राखीव खेळाडूंमध्ये उपलब्ध असताना त्यांनी अनुभवी अँजेलो मॅथ्यूजला पाथीरानाच्या जागी बदली खेळाडू म्हणून आणले आहे. श्रीलंकेची मुख्य डोकेदुखी ही त्यांची धार नसलेली गोलंदाजी ठरली आहे. इंग्लंडच्या फलंदाजांना फॉर्म गवसण्याच्या दृष्टीने ते फायदेशीर ठरू शकते. श्रीलंकेसाठी अव्वल फळीतील सदीरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, पथुम निसांका आणि चरिथ असलंका हे फलंदाज मात्र आशेचा किरण ठरले आहेत.
संघ-इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस अॅटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशिद, ज्यो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, ब्रायडन कार्स, डेव्हिड विली, मार्क वूड, ख्रिस वोक्स.
श्रीलंका : कुसल मेंडिस (कर्णधार), कुसल पेरेरा, पाथुम निसांका, लाहिरू कुमारा, दिमुथ कऊणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डिसिल्वा, महीश थीक्षाना, दुनिथ वेललागे, कसून रजिथा, अँजेलो मॅथ्यूज, दिलशान मदुशंका, दुशन हेमंथा, चमिका करुणारत्ने, बदली खेळाडू-दुश्मंथा चमीरा
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.









